अंतर्गत वादांमुळे महायुतीच्या प्रतिमेस धक्का; उमेदवारीविषयी जाहीर वक्तव्य न करण्याचा राष्ट्रवादीचा सल्ला

लोकसभा निवडणुकीत जागा वाटपावरून घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून सुरू असणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांमुळे महायुतीची प्रतिमा मलीन होत असून मतदारांमध्ये चुकीचा संदेश जात आहे.

नाशिक : लोकसभा निवडणुकीत जागा वाटपावरून घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून सुरू असणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांमुळे महायुतीची प्रतिमा मलीन होत असून मतदारांमध्ये चुकीचा संदेश जात आहे. त्यामुळे उमेदवारीविषयी घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीररित्या कुठलेही वक्तव्य करू नये, असे आवाहन राष्ट्रवादी अजित पवार गटाने केले आहे.

राज्यात शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट, रिपाइं या पक्षांनी एकत्र येत तयार केलेल्या महायुतीतील बेबनाव लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उघड होत आहे. नाशिकसह अनेक मतदारसंघावर दावा सांगत सर्व पक्ष परस्परांविरोधात शड्डू ठोकून आहेत. शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी युतीधर्म पाळला नाही, भाजप पदाधिकाऱ्यांना डाववले, असे आरोप अलीकडेच झाले होते. राष्ट्रवादीनेही या मतदारसंघावर हक्क सांगितला. काही ठिकाणी शिवसेनेचे नेते राष्ट्रवादी अजित पवार गटावर आगपाखड करत आहेत.

हे वाचले का?  नाशिक : सप्तश्रृंग गडासाठी जादा बससेवा

आरोप-प्रत्यारोपांनी महायुतीची प्रतिमा मलीन होत असून मतदारांमध्ये चुकीचा संदेश जात असल्याकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सरचिटणीस अर्जुन टिळे यांनी लक्ष वेधले. नाशिक लोकसभेची जागा आपल्याच पक्षाला मिळावी म्हणून पदाधिकाऱ्यांकडून उघडपणे हेवे-दावे, आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत. उमेदवाराच्या विजयासाठी हे चित्र घातक ठरण्याची शक्यता आहे. उमेदवारीबद्दल महायुतीचे नेते योग्य निर्णय घेतील. पुढील काळात विधानसभा, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आदी निवडणुकीतही एकत्रितपणे महायुतीला सामोरे जावे लागणार आहे. हे लक्षात घेऊन कोणीही पदाधिकाऱ्यांनी लोकसभा उमेदवारीविषयी जाहीरपणे वाच्यता करू नये असे आवाहन टिळे यांनी केले आहे.

हे वाचले का?  देवळालीत सरावावेळी तोफगोळ्याचा स्फोट, दोन अग्निविरांचा मृत्यू