अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी ‘या’ चार शहरांची चर्चा! २३ एप्रिलला एक ठिकाण होणार निश्चित

आगामी ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ २३ एप्रिल रोजी पुण्यामध्ये निश्चित होणार आहे.

पुणे : आगामी ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ २३ एप्रिल रोजी पुण्यामध्ये निश्चित होणार आहे. सातारा, औदुंबर, अंमळनेर आणि जालना या निमंत्रण आलेल्या चार स्थळांना साहित्य महामंडळाची स्थळ निवड समिती भेट देणार असून, २३ एप्रिल रोजी पुण्यामध्ये होणाऱ्या बैठकीमध्ये संमेलन स्थळाची घोषणा करण्यात येणार आहे.

महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांनी प्रगल्भ झालेल्या वर्धा येथील संमेलनाला जेमतेम ८० दिवस झाले असले तरी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला आता आगामी ९७ व्या साहित्य संमेलनाचे वेध लागले आहे. आगामी संमेलनासाठी सातारा, औदुंबर, अंमळनेर आणि जालना अशा चार ठिकाणांहून निमंत्रणे साहित्य महामंडळाकडे प्राप्त झाली आहेत. साहित्य महामंडळाची स्थळ निवड समिती एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात या स्थळांना भेट देऊन पाहणी करणार आहे. त्यानंतर २३ एप्रिल रोजी पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषद येथे होणाऱ्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत स्थळ निवड समितीच्या अहवालावर चर्चा होऊन आगामी संमेलन स्थळाची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्याने दिली.

हे वाचले का?  Nawab Malik : “आम्ही किंगमेकर राहणार, आमच्याशिवाय कोणतंही सरकार…”, अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान

दोनच वर्षांपूर्वी म्हणजे ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मराठवाड्यातील उदगीर येथे झाले होते. त्यामुळे जालना या स्थळाचा विचार होण्याची शक्यता कमी दिसते. सातारा येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहुपुरी शाखा, औदुंबर येथील औदुंबर साहित्य मंडळ आणि अंमळनेर येथील मराठी वाङ्मय मंडळ या तीन स्थळांपैकी एकाचा विचार होईल, याकडे साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्याने लक्ष वेधले.

हे वाचले का?  Maharashtra Election 2024 : यवतमाळमध्ये महायुती वर्चस्व कायम राखणार का ?