“अजित पवारांना अर्थखात्याचा पदभार दिला, तर…”, शिंदे गटातील नेत्याचं विधान

“आमचा राष्ट्रवादीला विरोध होताच. अजित पवार हे…”

अजित पवारांसह ९ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत नाराजी पसरली असल्याचं बोललं जात आहे. यावर आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोघांत तिसरा पक्ष येतो, तेव्हा काही प्रमाणात नाराजी असते. पण, कोणी नाराजी व्यक्त केली असेल, तर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री याची दक्षता घेतील, असं संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं.

‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना संजय शिरसाट म्हणाले, “राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाली आहे. त्यांच्या ताकदीचा आम्हालाही फायदा होणार आहे. राष्ट्रवादी आल्याने कोणी नाराजी व्यक्त केली असेल, तर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री त्याची दक्षता घेतील.”

हे वाचले का?  Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live: कालीचरण यांची मनोज जरांगे पाटील यांच्यावर जहरी टीका: म्हणाले…

मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? या प्रश्नावर संजय शिरसाट यांनी म्हटलं की, “ऐनवेळी अशा घटना घडल्याने, त्यांना प्राधान्य देणं गरजेचं आहे. शिवसेना आणि भाजपाचा मंत्रीमंडळ विस्तार दोन-तीन दिवसांत होईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही.”

भाजपा हा सर्वात भ्रष्ट पक्ष, शिंदे गटाचे पायपुसणे केले आहे, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली होती. याबद्दल विचारल्यावर संजय शिरसाट म्हणाले, “आम्हाला बहुमताची गरज होती का? आमचं मन मोठे आहे. सर्वांना बरोबर घेऊन महाराष्ट्राचा विकास करू इच्छितो आहे. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना काय बिघडलं असतं. किंवा भाजपा शिवसेनेबरोबर पहिल्यांदा युती केली असती, तर काय झालं असतं?”

हे वाचले का?  ६,६०० मेगावॉट वीजनिर्मितीचे कंत्राट ‘अदानी’लाच; ४.०८ रुपये प्रतियुनिट दरामुळे जेएसडब्ल्यू, टोरेंट कंपन्यांवर सरशी

राष्ट्रवादीला विरोध होता की एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्याने बाहेर पक्षातून बाहेर पडला? असा प्रश्न विचारल्यावर संजय शिरसाटांनी सांगितलं, “आमचा राष्ट्रवादीला विरोध होताच. अजित पवार हे त्यांच्या पक्षासाठी ताकदीतने काम करत होते. मी निधीसाठी अजित पवारांकडे गेलो होतो. तेव्हा ते म्हणायचे तुमच्या मुख्यमंत्र्यांना सांगा. पण, उद्धव ठाकरे भेटतही नव्हते आणि फोनही उचलत नव्हते.”

“अजित पवारांना अर्थखात्याचा पदभार दिला, तर आम्हाला अडचण नाही. एकनाथ शिंदे हे २४ तास सर्वांना उपलब्ध असतात. मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात. सर्व निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे,” असं संजय शिरसाट यांनी म्हटलं.