अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर साधला अप्रत्यक्ष निशाणा, म्हणाले “धर्मवीर चित्रपट…”

“बाकीच्यांनी मला काहीही सांगू नये,” असंही अजित पवार यांनी म्हटलं.

छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील विधानावरून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर भाजपाकडून सडकून टीका होत आहे. इतकच नाही तर भाजपाने अजित पवारांविरोधात राज्यभर आंदोलनंही केली. त्यानंतर अजित पवारांनी बुधवारी (४ जानेवारी) पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली. यावेळी अजित पवारांनी धर्मवीर या चित्रपटावरुन अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर निशाणा साधला.

छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणू नये, असं वक्तव्य अजित पवार यांनी अधिवेशनामध्ये केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून भाजपने राज्यभरात निदर्शनं सुरू केली. अखेर अजित पत्रकार परिषद घेऊन सडेतोड भूमिका मांडली. संभाजीराजेंना स्वराज्य रक्षक असंच म्हणावं ही माझी भूमिका आहे. मात्र शरद पवार यांनी सांगितल्याप्रमाणे जे धर्मवीर म्हणतात तो त्यांचा प्रश्न आहे, असे अजित पवारांनी सांगितले.

अजित पवार काय म्हणाले?

“मी तुमच्याशी बोलण्याच्या आधी सहज मोबाईलवर धर्मवीर उपाधी कुणा-कुणाला मिळाली याचा शोध घेतला. तुम्ही आता तुमच्या मोबाईलवर जाऊन धर्मवीर शब्द शोधलात तर जवळपास सात आठ लोकं आहेत ज्यांना धर्मवीर म्हटलं गेलं. तुम्ही त्यांचे फोटो बघा. संभाजी महाराजांना काहीजण धर्मवीर म्हणतात हे आपल्या सर्वांच्या बघण्यात आहे. तशाच प्रकारच्या उपाधी इतरांनाही दिलेल्या आहेत. काही जणांचे तर चित्रपट निघाले आहे. आता तर धर्मवीर चित्रपटाचा दुसरा भाग सुद्धा येणार आहे. आता काय चाललंय हे मला कळत नाही.

तुम्ही जर छत्रपती संभाजी महाराजांना अशी उपाधी देत असाल तर दुसरी कुणी व्यक्ती होऊच शकत नाही. जसं हिंदवी स्वराजाची स्थापन शिवाजी महाराजांनी केली तशी दुसरी व्यक्ती होऊ शकत नाही. त्यामुळे संभाजी महाराज यांनी स्वराज्याचं रक्षण केलं, त्यामुळे दुसऱ्या कुण्या व्यक्तीला स्वराज्यरक्षक म्हणू शकत नाही, हे माझं मत आहे. माझं मत सर्वांना मान्य व्हावे, अशी माझी भूमिका नाही. पण संविधानाने दिलेले अधिकार आहे, त्यातून बाजू मांडली पाहिजे. बाकीच्यांनी मला काहीही सांगू नये,” असंही अजित पवार यांनी म्हटलं.

मी वादग्रस्त वक्तव्य केलेलं नाही
मला एका गोष्टीची गंमत वाटते की मी आत्तापर्यंत कुठल्याही महापुरूषांच्या विरोधात चुकीचं काहीही बोललो नाही. त्याआधी आम्ही जो महामोर्चा काढला त्यावेळी राज्यपालांनी महापुरूषांविषयी बेताल वक्तव्यं केली होती. मला एक कळत नाही भाजपाने माझ्या विरोधात आंदोलन करा सांगितलं. राजीनामा मागा. मी सांगू इच्छितो की माझं पद हे मला भाजपाने दिलेलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेने दिलं. संभाजीराजेंविषयी मी काहीही चुकीचं बोललो नव्हतो. मी वादग्रस्त वक्तव्य केलेलं नाही. वादग्रस्त वक्तव्य राज्यपालांनी केलं, त्यांच्या नेत्यांनी केलं. तसंच शरद पवार यांनी जे सांगितलं आहे त्या मताशीही मी सहमत आहे असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

राज्यपाल, मंत्री महोदय, भाजपाचे आमदार, भाजपाचे नेते या सगळ्यांनी मला विरोधी पक्षनेते पद दिलेलं नाही. तसंच वादग्रस्त वक्तव्यं त्यांनी केली आहेत. माझ्या विरोधात आंदोलनं करणाऱ्यांनी जरा अंतर्मनाला विचारावं मला शिकवू नका असाही टोला भाजपाला अजित पवार यांनी लगावला. असा कुठलाही गुन्हा केलेला नाही. त्यामध्ये काही अपराधिक भाव होते असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. मी इतिहासातलं काहीही चुकीचं मत मांडलेलं नाही. अमोल कोल्हे यांनीही याबाबत भूमिका मांडली आहे. इतिहासकारांनीही भूमिका मांडली आहे. उगाच राजकारण करण्यासाठी कुणीही या गोष्टीचा वापर करू नये असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

हे वाचले का?  Sanjay Shirsat: भरत गोगावलेंचं मंत्रीपद संजय शिरसाटांमुळे हुकलं? ‘या’ विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण; शिंदे गटातली धुसफूस चव्हाट्यावर!