अडीच रुपयांपासून एकदा वापरून फेकलेल्या नोटेपर्यंत..; नाशिकरोड मुद्रणालयात चलनी नोटांचे प्रदर्शन

नाशिकरोड येथील भारत प्रतिभूती मुद्रणालयाच्या आवारात भारतीय चलनी नोटांचे प्रदर्शन नाशिककरांना खुले झाले आहे.

नाशिक : अडीच रुपयांची नोट..दोन हजाराची नोट.. पाच हजार आणि १० हजाराची नोट अशा विविध नोटा, याशिवाय एकदा वापरून फेकली जाणारी नोट.. हाताने बनवलेली आणि एक बाजू कोरी असलेली नोट, असा सारा नोटांचा खजिना सध्या नाशिककरांचे लक्ष वेधून घेत आहे. नाशिकरोड येथील भारत प्रतिभूती मुद्रणालयाच्या आवारात भारतीय चलनी नोटांचे प्रदर्शन नाशिककरांना खुले झाले आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी नाशिककर मोठय़ा संख्येने गर्दी करत आहेत. प्रदर्शनाचे उद्घाटन खा. हेमंत गोडसे, नवी दिल्लीतील प्रेस महामंडळाच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक तृप्ती पात्रा घोष, विनयकुमार सिंग, बी. के. आनंद, मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बनायत, प्राप्तीकरचे सहआयुक्त शैलेंद्र राजपूत, अमितकुमार सिंग, बीएसएनएलचे नितीन महाजन आदी उपस्थित होते.
यावेळी खासदार गोडसे यांनी मार्गदर्शन केले. चलनी नोटांची छपाई नाशिकरोडच्या मुद्रणालयात होते. आपले चलन ही आपली ओळख आहे. आता ई पारपत्रही नाशिकरोडच्या भारतीय प्रतिभूती मुद्रणालयात छापले जाणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे मोठे यश असून मुद्रणालयाच्या आधुनिकतेसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे गोडसे यांनी सांगितले.
प्रदर्शनात व्यवहारात चलन म्हणून वापरले जाणारे पैसे, नाणी, नोटा यांची माहिती देण्यात आली आहे. भारतात सुरुवातीला विविध धातूतील नाणी चलन म्हणून वापरली जात असत. मात्र, धातूंची टंचाई जाणवू लागल्यानंतर नोटा आल्या. नोटांचा आकार, रंग, त्या त्या वेळचा इतिहास याची माहिती दिली जात आहे. भारतात मुंबई, मद्रास, कलकत्ता प्रांताच्या नोटा होत्या. मात्र, त्या फक्त त्याच प्रांतात चालत असत. त्यांचा पेपर हाताने तयार केला जात असे. शाई, कागद, नवीन तंत्रज्ञान असलेले ड्राय ऑफसेट छपाई आदींची माहिती प्रदर्शनात देण्यात आली.
प्रदर्शनात सर्व ऐतिहासिक नोटांबरोबरच अडीच रुपयांचीही नोट आहे. एक रुपयापासून १० हजारापर्यंतच्या नोटांचा आकार, रंग आणि छपाईत होत गेलेले बदल येथे पाहण्यास मिळतात. खोटय़ा नोटा कशा ओळखाव्यात याची माहिती देणारा विभाग प्रदर्शनात आहे. नोटांच्या इतिहासाचा माहितीपट येथे दाखवला जातो. इंग्लडमध्ये
भारतीय नोटांची छपाई सुरू झाली तेव्हापासून भारत याबाबतीत स्वयंपूर्ण कसा झाला, या वाटचालीची अभिमानास्पद माहिती देणारा कक्षही आहे. प्रदर्शन साऱ्यांसाठी खुले आहे. प्रदर्शनासाठी आधार कार्ड आवश्यक आहे.
प्रदर्शन पाहण्यासाठी नाशिककरांनी मोठय़ा संख्येने गर्दी केली होती. नोटांचा इतिहास, त्यातील नवलाई अनुभवण्यासाठी नाशिककर सकाळपासूनच प्रदर्शनस्थळी पोहचले. शनिवार प्रदर्शनाचा अखेरचा दिवस आहे. नाशिककरांनी या प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
देश- विदेशातील नोटांची छपाई
नाशिकरोड मुद्रणालयात विविध देशांच्याही नोटा छापण्यात आल्या. फाळणीनंतर १९४८ साली पाकिस्तानला दोन रुपयांची नोट छापून देण्यात आली. मात्र, त्यावर नाव भारतीय रिझव्‍‌र्ह बॅंकेचे होते. चीनसाठी (१९४०) १० युहानच्या नोटा छापण्यात आल्या. पूर्व आफ्रिका, इराक, भूतान, नेपाळ, श्रीलंका (१९७१), बांगलादेश (१९७२), बर्मा (ब्रह्मदेश), हैदराबादचा निजाम यांच्या नोटांची छपाई नाशिकरोडला झाली. इराकच्या राजाचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर त्याचा १३ वर्षांचा मुलगा फैजल गादीवर बसला. त्याचे चित्र असलेली अर्धा आणि एक दिनारची नोट १९३१ साली नाशिकरोडला छापण्यात आली. ती दुर्मीळ असल्याने तिची आताची किमत ३० लाख रुपये आहे.

हे वाचले का?  गणेशोत्सवातून विधानसभेसाठी मोर्चेबांधणी; फलकबाजी, आरती संग्रह वितरण, ढोल-ताशा महोत्सव