अफगाणिस्तानात भूकंपाचे धक्के ; १००० मृत्युमुखी, दीड हजारांवर जखमी; डोंगराळ भागामुळे मदतकार्यात अडथळे

गेल्या दोन दशकांतील अफगाणिस्तानमध्ये आलेला हा सर्वात विनाशकारी भूकंप आहे.

काबूल : अफगाणिस्तानच्या पूर्व भागात बुधवारी पहाटे झालेल्या ६.१ रिश्टर स्केल तीव्रतेच्या मोठय़ा भूकंपाच्या धक्क्यामुळे एक हजार जण मृत्युमुखी पडले, तर सुमारे दीड हजारांवर जखमी झाले आहेत. अफगाणिस्तानच्या ‘बख्तर’ या अधिकृत वृत्तसंस्थेने ही माहिती दिली. भूकंपग्रस्तांसाठी मदत व बचावकार्य सुरू असले तरी त्यात अडथळे येत आहेत. भूकंपग्रस्त ग्रामीण भाग प्रामुख्याने डोंगराळ असल्यानेही अडचणी येत आहेत. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याचीही भीती व्यक्त होत आहे. गेल्या दोन दशकांतील अफगाणिस्तानमध्ये आलेला हा सर्वात विनाशकारी भूकंप आहे.

गेल्या वर्षी अमेरिकेच्या सैन्याने अफगाणिस्तानातून माघार घेतल्यानंतर तालिबानने येथील सत्ता काबीज केल्यानंतर अनेक आंतरराष्ट्रीय मदत संस्थाही या देशातून निघून गेल्यानेही मदत मोहिमेत अडचणी येत आहेत. अद्याप किती नुकसान झाले, त्याचा तपशील समजू शकलेला नाही. या भूकंपग्रस्त दुर्गम डोंगराळ भागात कच्च्या बांधकामाची घरे आणि इतर इमारतीही पुरेशा मजबूत नाहीत आणि येथे भूस्खलनही सातत्याने होत असते. पाकिस्तानच्या हवामान विभागाने सांगितले की, भूकंपाचा केंद्रिबदू अफगाणिस्तानच्या पख्तिका प्रांतातील खोस्त शहरापासून ५० किलोमीटर र्नैऋत्येला होता. खोस्त येथे इमारतींचेही नुकसान झाले आहे. पाकिस्तानच्याही काही भागांत भूकंपाचे धक्के जाणवले.

हे वाचले का?  भारतीय संघ पाकिस्तानला जाणार? परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची पाक नेत्याबरोबर काय चर्चा झाली?

या भूकंपाने तालिबान सरकारसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. साहाय्यता पथक हेलिकॉप्टरने घटनास्थळी पोहोचले; परंतु येथे व्यापक मोहीम राबवण्याइतपत प्रभावी यंत्रणेचाच अभाव आहे. पख्तिका येथे घटनास्थळाच्या चित्रफितीत ब्लँकेटमध्ये गुंडाळलेल्या जखमींना उपचारार्थ नेण्यासाठी लोक हेलिकॉप्टरची वाट पाहात असल्याचे दिसत होते. अफगाणिस्तानचे आपत्कालीन सेवा अधिकारी शराफुद्दीन मुस्लीम यांनी सांगितले, की २००२ नंतरचा हा देशातील सर्वात विनाशकारी भूकंप आहे, त्याही वेळी ६.१ रिश्टर स्केलच्या भूकंपात सुमारे एक हजार जणांचा मृत्यू झाला होता.

अमेरिकेचे भूकंपतज्ज्ञ रॉबर्ट सँडर्स यांनी सांगितले की, जगात बहुतांश ठिकाणी एवढय़ा तीव्रतेच्या भूकंपांने मोठय़ा प्रमाणावर विनाश होतोच. हा डोंगराळ भाग असल्याने येथे दरडी कोसळण्याचीही भीती आहे. अजून तपशील कळू शकलेला नाही. या भूकंपाच्या धक्क्यामुळे खिळखिळय़ा झालेल्या जुन्या इमारती कोसळण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी, तालिबान सरकार संचालित बख्तर वृत्तसंस्थेचे महासंचालक अब्दुल वाहिद रायन यांनी ‘ट्वीट’द्वारे सांगितले की, पख्तिकामध्ये ९० घरे उद्ध्वस्त झाली आहेत व अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. अफगाण रेड क्रिसेंट सोसायटीने भूकंपग्रस्त भागात सुमारे चार हजार ब्लँकेट, ८०० तंबू आणि ८०० स्वयंपाकाचे साहित्य संच पाठवले आहेत.

हे वाचले का?  Vladimir Putin : “भारत जागतिक महासत्तांच्या यादीत हवा”, पुतिन यांची स्तुतीसुमनं; म्हणाले, “त्यांचं भविष्य…”

भारताकडून मदतीचा हात

या भूकंपात मोठय़ा संख्येने जीवितहानी झाल्याबद्दल भारताने शोक व्यक्त केला व भूकंपग्रस्तांच्या मदत पाठवण्याचे आश्वासन दिले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ‘ट्विट’ केले, की अफगाणिस्तानमधील भीषण भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती व बाधितांच्या दु:खात भारत सहभागी आहे. या गरजेच्या वेळी त्यांना मदतीसाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

मदतसंस्थांना आवाहन

तालिबान सरकारचे उपप्रवक्ते बिलाल करीमी यांनी ‘ट्वीट’मध्ये म्हटले आहे, की आम्ही सर्व मदतसंस्थांना मदत पथक घटनास्थळी पाठवण्याचे आवाहन करतो. भूकंपग्रस्तांसाठी मदतकार्यात समन्वय साधण्यासाठी राष्ट्राध्यक्ष निवासस्थानी तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेचे अफगाणिस्तानातील समन्वयक रमिझ अकबरोव्ह यांनी मदतकार्य सुरू असल्याचे ‘ट्वीट’ केले. 

हे वाचले का?  Russia Attack On Ukraine : रशियाचा युक्रेनवर पुन्हा क्षेपणास्र हल्ला, पोल्टावामधील लष्करी शिक्षण संस्थेला केलं लक्ष्य; ५० जणांचा मृत्यू, २७१ जखमी

पाकिस्तानातही धक्केएकाचा मृत्यू

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या अनेक भागांना ६.१ तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला, ज्यात खैबर-पख्तूनख्वा प्रांतात एकाचा मृत्यू झाला. स्थानिक प्रसारमाध्यमांनी ही माहिती दिली. स्थानिक वेळेनुसार रात्री उशिरा एक वाजून ५४ मिनिटांनी भूकंप झाला. पेशावर, इस्लामाबाद, लाहोर, तसेच पंजाब आणि खैबर-पख्तूनख्वाच्या इतर भागात भूकंपाचे धक्के जाणवले. खैबर-पख्तुनख्वामध्ये भूकंपाच्या धक्क्यांमुळे घराचे छत कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला.