अबब…धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर जळगावात १०० किलोवर सोने विक्री

देशभरात प्रसिद्ध असलेल्या सुवर्णनगरीत नेहमीच सोने खरेदीसाठी गर्दी असते. नवरात्रोत्सवापासून सुरू झालेला सुवर्णखरेदीचा उत्साह अद्याप कायम आहे.

जळगाव : धनत्रयोदशीनिमित्त सुवर्णनगरी जळगावातील सराफी बाजारपेठ चांगलीच गजबजली. सोने दर प्रतितोळा ६१ हजार, तर चांदीचा दर प्रतिकिलो ७३ हजारांपर्यंत होता. गतवर्षापेक्षा यंदा सोन्याचा दर अधिक असला, तरी सोने खरेदीला चांगला प्रतिसाद लाभला. शंभर किलोपेक्षा अधिक सोने विक्री झाल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. देशभरात प्रसिद्ध असलेल्या सुवर्णनगरीत नेहमीच सोने खरेदीसाठी गर्दी असते. नवरात्रोत्सवापासून सुरू झालेला सुवर्णखरेदीचा उत्साह अद्याप कायम आहे.

ऑक्टोबरमध्ये सोन्या-चांदीच्या दराने उसळी घेतली होती. त्यावेळी सोन्याच्या दरात तीन हजार ६०० रुपयांची वाढ झाली होती. सुरुवातीलाच सोन्याचे दर प्रतितोळा ५७ हजार ७०० रुपये होते आणि ऑक्टोबरअखेर सोने प्रतितोळा ६२ हजारांपेक्षा अधिक झाले होते आणि चांदीही प्रतिकिलो ७३ हजारांवर पोहोचली होती. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये दरात चढ-उतार दिसून आले. आता तीन दिवसांत सोन्याचे दर प्रतितोळा साडेसातशे रुपयांनी कमी झाले. सहा नोव्हेंबरला सोने प्रतितोळा ६१ हजार ४५० रुपयापर्यंत होते.

ते कमी होऊन आठ नोव्हेंबरपर्यंत ६१ हजार १०० रुपयांवर आले. गुरुवारी पुन्हा चारशे रुपयांची घसरण होऊन ते ६० हजार ७०० रुपयांपर्यंत, तर चांदीच्याही दरातही प्रतिकिलोला पाचशे रुपयांची घसरण होत ७१ हजार ६०० रुपयांपर्यंत होते. गेल्या तीन दिवसांत चांदीच्या दरात प्रतिकिलोला साडेनऊशे रुपयांनी घसरण झाली. शुक्रवारी धनत्रयोदशीला सोन्याच्या दरात प्रतितोळा तीनशे रुपयांची वाढ होत ६१ हजार रुपये, तर चांदीच्या दरात प्रतिकिलो चौदाशेची वाढ होत ७३ हजार झाले होते.