रुग्णालयांमध्ये जागाही मिळेना
भारतासह जगातील अनेक देशांमध्ये करोनानं डोकं वर काढलं आहे. दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होताना दिसत असून, अनेक देशांनी लॉकडाउनचा निर्णयही घेतला. करोनाचा प्रादुर्भाव झालेल्या इतर देशांबरोबरच अमेरिकेतील परिस्थितीही पुन्हा एकदा चिंताजनक होताना दिसत आहे. तब्बल सहा महिन्यानंतर अमेरिकेत सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली असून, प्रत्येक ४० सेंकदाला एका व्यक्तीला जीव गमावावा लागला आहे.
अमेरिकेत करोनाचं संकट अधिक गडद होताना दिसत आहे. मागील सहा महिन्यानंतर म्हणजे मे नंतर पहिल्याच अमेरिकेत सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासात अमेरिकेत २ हजार १५७ रुग्णांचा करोना संसर्गामुळे मृत्यू झाले आहेत. गेल्या २४ तासात ४० सेंकदा एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली असून, अमेरिकेतील परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे.
करोनाची रुग्णसंख्या अचानक वाढल्यानं अमेरिकेतील रुग्णालयांमध्ये नव्या रुग्णांसाठी बेडच शिल्लक राहिलेले नाहीत. मंगळवारी अमेरिकेत १ लाख ७० नवीन रुग्ण आढळून आले. हा आकडा आणखी वाढू शकतो, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. करोना उद्रेक झाल्यापासून आतापर्यंत अमेरिकेत २ लाख ६० हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १२.६ मिलियन नागरिक करोनाबाधित झाले आहेत. मंगळवारी मृत्यूच्या संख्येत झालेली वाढ सहा महिन्यानंतरची सर्वात मोठी वाढ आहे. एप्रिलमध्ये अमेरिकेत २४ तासांत ३ हजार ३८४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती.
भारतातील परिस्थिती कशी?
देशात अमेरिकेसारखी भयावह परिस्थिती नसली, तरी दिवसेंदिवस चिंता वाढताना दिसत आहे. अनेक राज्यांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. राजधानी दिल्लीत करोनाची लाट आली आहे. तर इतर राज्यांमध्ये दिवसभरात आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येनं मोठी उसळी घेतली आहे. त्यामुळे सरकारकडून पुन्हा एकदा काही प्रमाणात निर्बंध आणले जात आहेत.