अवैध वृक्षतोडीविरोधात नाशिककरांचा आंदोलनाचा इशारा

उत्तुंग झेप फाउंडेशन  संस्थेतर्फे रोहन देशपांडे, पर्यावरणतज्ज्ञ अश्विनी भट, उदय थोरात व सहकाऱ्यांनी विभागीय, मनपा आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

नाशिक : शहरात अवैध पध्दतीने २९ वृक्षांची तोड करण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्याला कडाडून विरोध करण्यासाठी ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ सुंदरलाल बहुगुणा यांना समर्पित हॅशटॅग चिपको, नाशिक ही चळवळ पुढे सरसावली आहे.

उत्तुंग झेप फाउंडेशन  संस्थेतर्फे रोहन देशपांडे, पर्यावरणतज्ज्ञ अश्विनी भट, उदय थोरात व सहकाऱ्यांनी विभागीय, मनपा आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यात वृक्ष प्राधिकरण समितीने सर्वोच्च आणि मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचा अवमान न करता पालन करावे अन्यथा जिल्ह्यत सांकेतिक पध्दतीने आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला आहे. आमचा शासन, प्रशासनाला कोणताही विरोध नाही. मात्र परस्परांमध्ये समन्वय नसल्याने  गंगापूर रोड परिसरातील वृक्षांचा बळी जाईल. तो थांबविण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत. प्राधिकरणाने वृक्षतोडीविरुद्धच्या जनहित याचिकेचे तसेच मुंबई उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांचे उल्लंघन करू नये. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एका वृक्षाचे दरवर्षांचे मूल्य ९४५०० रुपये असते. वृक्षाच्या वयानुसार ते वाढत जाते.

हे वाचले का?  गणेशोत्सवातून विधानसभेसाठी मोर्चेबांधणी; फलकबाजी, आरती संग्रह वितरण, ढोल-ताशा महोत्सव

अलीकडेच राज्य शासनाने ५० वर्षांंवरील वृक्षांना हेरिटेज दर्जा दिला आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी निर्देश दिले आहेत. यापूर्वीच्या सिंहस्थ काळात जवळपास २३२ वृक्ष महापालिकेने पुनर्रोपित  केल्याची नोंद आहे. मात्र त्याबत विचारलेल्या प्रश्नांना अधिकृत उत्तरे देण्याचे टाळून माहिती अधिकाराचे उल्लंघन करण्यात आले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

रस्त्यांच्या दुतर्फा दर १० फुटांवर १० फूट उंच वाढलेले देशी ( स्थानिक) वृक्ष लावून जतन करण्याच्या १९७५ व २००९ च्या आदेशांचे पालन महापालिका करीत नाही. याकडेही निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे. बंगला, इमारतीच्या पूर्णत्व दाखल्यापूर्वी नियमानुसार झाडे लावून त्याचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक असते. परंतु त्याचेही काटेकोरपणे पालन होत नाही. त्यामुळेच संबंधित यंत्रणेवर गुन्हे दाखल करावेत. वृक्षांमुळे अपघात होत नसून भरधाव वेग, मद्यपान करून वाहन चालविणे तसेच मानवी हलगर्जीपणामुळे निरपराध वृक्ष बळी ठरतात, असा अहवाल पोलीस आणि प्रादेशिक परिवहनने दिला आहे.

हे वाचले का?  नाशिक : शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी

करोनाच्या काळात प्राणवायूची अत्यंत गरज असतांना झाडांचे खून कशासाठी, असा प्रश्न उपस्थित करून वृक्षतोड करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करतांना मनुष्यवधाची कलमे लावावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. रात्रीच्या अंधारात झाडे न दिसल्यास अपघात होतात. ते टाळण्यासाठी रस्त्याजवळच्या झाडांना फ्लोरोसेंट रंग लावावा. त्यामुळे माणसांचे व झाडांचे प्राण वाचतील, असेही निवेदनात सुचविण्यात आले आहे.

प्रतिकात्मक आंदोलनाला प्रतिसाद

झाडांना मिठी मारत प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. त्यात गणेश ताजनपुरे, किरण साळवे,भारती जाधव, शांताराम पवार, संदीप कारवाल, विलास कांबळे, सचिन मोरे आदी पर्यावरणप्रेमी सहभागी झाले. यावेळी शहर, परिसर किंवा नाशिक जिल्ह्यत कुठेही आपल्या आजूबाजूला वृक्षतोड होतांना आढळून आल्यास सुजाण नागरिकांनी ताबडतोब दखल घ्यावी. त्या वृक्षाला प्रेमाने मिठी मारून त्याचे छायाचित्र हॅशटॅग चिपको नाशिकला पाठवावे. सोबत ठिकाण नमूद करावे असे आवाहन करण्यात आले आहे. त्याला तत्काळ प्रतिसाद दिला जाईल व वृक्षहत्येला निकराचा प्रतिकार करण्यात येईल असे उत्तुंग झेप फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन देशपांडे यांनी नमूद केले आहे.