आकाशवाणीच्या ‘एफएम’ सेवेचा ८४ जिल्ह्यांमध्ये विस्तार! विधानसभा निवडणूक होणाऱ्या मध्य प्रदेश, राजस्थानात सर्वाधिक केंद्रे

‘मन की बात’ या आकाशवाणीवरील कार्यक्रमाच्या शतकपूर्तीच्या दोन दिवस आधी, शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९१ एफएम ट्रान्समीटरांचे आभासी समारंभात उद्घाटन केले.

नवी दिल्ली : ‘मन की बात’ या आकाशवाणीवरील कार्यक्रमाच्या शतकपूर्तीच्या दोन दिवस आधी, शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९१ एफएम ट्रान्समीटरांचे आभासी समारंभात उद्घाटन केले. १८ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतील ८४ जिल्ह्यांमध्ये आकाशवाणीच्या एफएम सेवेचा विस्तार होणार आहे. सीमा भागांमधील तसेच, निश्चित केलेल्या अन्य जिल्हांमधील सुमारे दोन कोटी लोक पहिल्यांदाच एफएम सेवेशी जोडले जातील.

सर्वाधिक प्रत्येकी १३ एफएम ट्रान्समीटर्स मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये बसवण्यात आले आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये पुढील सहा महिन्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे आकाशवाणीच्या एफएम सेवेचा विस्तार हा भाजपच्या धोरणाचा भाग असल्याचे मानले जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी एफएम रेडिओचे देशव्यापी जाळे विस्तारण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. केंद्र सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोदींनी ‘मन की बात’चा व्यापक उपयोग केला आहे. रेडिओच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा मनोदय मोदींनी केला व त्याद्वारे आकाशवाणीचे माध्यम पुनरुज्जीवित केल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे.

हे वाचले का?  Lateral entry ad cancel: वरिष्ठ अधिकाऱ्यांची थेट भरती अखेर UPSC कडून रद्द; विरोधकांच्या दबावानंतर केंद्र सरकारचे घुमजाव

मोदींनी ‘मन की बात’चा थेट उल्लेख केला नसला तरी, रेडिओ-एफएम यांच्याशी माझे जवळचे नाते असल्याचे ते उद्घाटन समारंभात म्हणाले. एफएम सेवेमुळे महत्त्वाची माहिती लोकांपर्यंत वेळेवर पोहोचू शकते. हवामानाचा अंदाज, कृषीविषयक माहिती, महिला बचत गटांसाठी नव्या बाजारपेठांची माहिती पोहोचवण्याचे काम एफएम केंद्रे करत आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत आकाशवाणीची सेवा न पोहोचलेल्या अधिकाधिक लोकांना एफएम सेवेद्वारे जोडून घेणे गरजेचे असल्याचे मत मोदींनी व्यक्त केले.

हे वाचले का?  उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन

सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल इतक्या कमी किमतीमध्ये तंत्रज्ञान पोहोचवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असतो. प्रत्येक नागरिकासाठी हे तंत्रज्ञान उपलब्ध असले पाहिजे. किफायतशीर मोबाइल यंत्रे व सेवांमुळे माहितीही अधिकाधिक लोकांपर्यंत झिरपते. तंत्रज्ञानामुळे एफएम सेवाही देशव्यापी होऊ लागली आहे. आकाशवाणीच्या दूरदृष्टीमुळे देश एकत्र जोडला गेला आहे. तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे रेडिओ व एफएम सेवांना नवी दिशा मिळाली आहे. डिजिटल भारताने नवे श्रोते मिळवून दिले आहेत, असे असेही मोदी म्हणाले.

दृष्टिक्षेपात

एफएम सेवा आता देशातील ७३.४६ टक्के लोकांपर्यंत आणि ५९.६२ टक्के भौगोलिक परिसरापर्यंत पोहोचेल.
१०० वॉट एफएम सेवेचा परीघ १० ते १२ मैलाचा असून ३०० ते ४०० चौरस किमी परिसरात ती उपलब्ध होणार आहे.
महाराष्ट्रात आकाशवाणीची सात नवी एफएम ट्रान्समीटर बसविण्यात आली आहेत.

हे वाचले का?  Narendra Modi : मोदींचं पोलंडमध्ये मराठीतून भाषण! कोल्हापूर स्मारकाला भेट देऊन म्हणाले, “छत्रपती घराण्याने पोलिश महिला व मुलांसाठी…”