आज उद्धव ठाकरे यांचे नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन; काळाराम मंदिरात महाआरती, गोदा पूजन

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी २३ जानेवारी रोजी पक्षाचे राज्यव्यापी महाशिबीर व सायंकाळी जाहीर सभा होणार आहे.

नाशिक : अयोध्येतील राम मंदिरात मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, सोमवारी शिवसेना ठाकरे गटाने श्रीरामाच्या भूमीचा संदर्भ देत नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शनाची तयारी केली आहे. सोमवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकास भेट देऊन पंचवटीतील काळाराम मंदिरात श्रीरामाची महाआरती आणि रामकुंडावर गोदा पूजन करणार आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी २३ जानेवारी रोजी पक्षाचे राज्यव्यापी महाशिबीर व सायंकाळी जाहीर सभा होणार आहे. या निमित्ताने शहरातील प्रमुख चौक व रस्ते झेंडे, पताकांनी भगवेमय करून वातावरण निर्मिती करण्यात आली आहे.

हे वाचले का?  नाशिक : लाडकी बहीण मेळाव्यामुळे आज वाहतूक मार्गात बदल

ठाकरे गटाने नाशिक या प्रभु श्रीरामाच्या भूमीतून लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याचे जाहीर केल्यानंतर भाजप, शिवसेनेसह (शिंदे गट) राजकीय पदाधिकाऱ्यांचा काळाराम मंदिरात दर्शनासाठी ओघ सुरु झाला. अयोध्येतील सोहळ्याच्या दिवशी ठाकरे गटाने नाशिकमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. मंगळवारी सकाळी त्र्यंबक रस्त्यावरील हॉटेल डेमोक्रसी येथे महाशिबीर होईल. त्यात राज्यभरातून सुमारे १६०० प्रतिनिधी सहभागी होत आहेत. याच दिवशी सायंकाळी ठाकरे यांची जाहीर सभा हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर होणार आहे. यावेळी शाहिरी, पोवाडे, अंबाबाईचा गोंधळ अशा सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आल्याचे खा. संजय राऊत यांनी सांगितले. सकाळच्या शिबिरात लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाचे निर्णय घेतले जातील. त्या अनुषंगाने काही ठराव मांडले जाणार आहेत.

हे वाचले का?  आदिवासी विद्यार्थ्यांना आता बोलीभाषेत शिक्षण, चौथीपर्यंतच्या क्रमिक पुस्तकांचे १२ स्थानिक भाषांमध्ये रूपांतर

अयोध्येतील लढ्यात शिवसेनेचे राज्यातील तत्कालीन खासदार, जिल्हाप्रमुख व तालुकाप्रमुख असे अनेक जण सहभागी झाले होते. या कारसेवकांवर झालेल्या कारवाया, पोलीस ठाणे व न्यायालयातील हजेरी यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन शिबीर स्थळी होणार आहे. यावेळी कारसेवकांचा सत्कारही करण्यात येणार आहे. शिवसेनेने भव्य गंगा आरतीची सुरुवात केली. त्याच पध्दतीने येथेही गंगा पूजन केले जाणार आहे. नाशिकमधील सोमवारी होणारे कार्यक्रम बिगर राजकीय असून त्यात नाशिककरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ठाकरे गटाने केले आहे.

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेतून फोडण्यात येणार आहे. त्यामुळे हे सर्व कार्यक्रम आणि सभा यशस्वी करण्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे.

हे वाचले का?  नाशिकमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज विविध कार्यक्रम