तालिबानने अफगाणिस्तानातील सरकारी कर्मचाऱ्यांना २० वर्षांपूर्वीसारखेच राहण्याचा इशारा दिला आहे.
अफगाणिस्तानवर तालिबानने संपूर्ण ताबा मिळवल्यानंतर युद्ध संपल्याची घोषणा केली आहे. आता अफगाणिस्तानात तालिबानचे राज्य परत आले आहे. तालिबानने रविवारी राजधानी काबूलवर ताबा मिळवला. यानंतर राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी आणि अन्य राजकारण्यांनी देश सोडला आहे. यानंतर तालिबानच्या प्रवक्त्याने युद्ध संपल्याची घोषणा केली आहे. तालिबानने अफगाणिस्तानातील सरकारी कर्मचाऱ्यांना २० वर्षांपूर्वीसारखेच राहण्याचा इशारा दिला आहे.
तालिबानचे प्रवक्ते मोहम्मद नईम यांनी अल जझीरा टीव्हीला सांगितले, “अफगाणिस्तानच्या लोकांसाठी आणि मुजाहिदीनसाठी आजचा दिवस खूप मोठा आहे. २० वर्षांचे बलिदान आणि मेहनत फळाला आली आहे. अल्लाहचे आभार.”
नवीन सरकारचे स्वरुप लवकरच स्पष्ट
“अफगाणिस्तानमधील नवीन सरकारचे स्वरूप काय असेल, ते लवकरच स्पष्ट होईल. तालिबान संपूर्ण जगापासून दूर राहू इच्छित नाही आणि आम्हाला शांततापूर्ण आंतरराष्ट्रीय संबंध हवे आहेत, “असे नईम म्हणाले.
अफगाण सरकारने विनाशर्त शरण येऊन सत्तेचे ‘शांततापूर्ण हस्तांतर’ करावे असे आवाहन तालिबानी बंडखोरांनी केले होते. त्यानंतर एका व्हिडिओमध्ये तालिबानी लोक राष्ट्रपती भवनात बसलेले दिसत आहेत.
नवीन शासन संपूर्ण परदेशी सैन्य परतल्यानंतरच
तालिबानच्या एका नेत्याने बंडखोर वेगवेगळ्या प्रांतातून पुन्हा एकत्र येत आहेत आणि नवीन शासन संरचना तयार करण्यासाठी परदेशी सैन्य निघून जाण्याची वाट पाहत आहेत असे रॉयटर्सला सांगितले.
“अफगाणांना दैनंदिन कामकाज पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि नागरिकांना घाबरवण्यासाठी काहीही करू नका,” असे आदेश तालिबानींना देण्यात आल्याचे देखील या नेत्याने सांगितले. “यानंतर लोकांचे जीवन अधिक चांगल्या प्रकारे चालू राहील, मी एवढेच सांगू शकतो,” असे त्यांनी रॉयटर्सला सांगितले.