आदिवासी विकास विभागातील पदभरती तूर्त स्थगित; सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या मागास संवर्गाच्या समावेशाची सूचना

आदिवासी विकास विभाग राज्य स्तरावरून या पदभरती जाहिरातीनुसार २३ नोव्हेंबर २०२३ ते १३ डिसेंबर २०२३ या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. विविध पदांसाठी उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन प्राप्त झाले होते.

नाशिक – आदिवासी विकास विभागातील ६०२ विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु शासन निर्देशानुसार काही अपरिहार्य कारणामुळे ही पदभरती तूर्त स्थगित करण्यात आल्याचे या विभागाच्या आयुक्त नयना गुंडे यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

हे वाचले का?  भूखंडाचे तुकडे करणाऱ्या प्रकल्पांची चौकशी; ‘म्हाडा’च्या पत्रानुसार नाशिक जिल्हा प्रशासनातर्फे समिती स्थापन

आदिवासी विकास विभाग राज्य स्तरावरून या पदभरती जाहिरातीनुसार २३ नोव्हेंबर २०२३ ते १३ डिसेंबर २०२३ या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. विविध पदांसाठी उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन प्राप्त झाले होते. तथापि २६ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १६ अन्वये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (एसईबीसी) या संवर्गाचा समावेश करून त्यानुसार बिंदुनामावली अद्ययावत करून गट क संवर्गासाठी जाहिरात पुनश्च प्रसिद्ध करण्याबाबत शासनस्तरावरून सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे आधीची जाहिरात तूर्तास स्थगित करण्यात आली असून याची नोंद उमेदवारांनी घेण्याचे आवाहन पत्रकात करण्यात आले आहे. तसेच, आदिवासी विकास विभागातील क्षेत्रीय कार्यालयाकडून पुनश्च बिंदुनामावली अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे त्यानंतर याबाबतची पुढील कार्यवाही कळविण्यात येणार असल्याची अर्ज भरलेल्या उमेदवारांनी नोंद घ्यावी, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.