आपल्या भागातील ऐतिहासिक रेल्वे स्थानकांना भेट द्यावी!; पंतप्रधान मोदींचे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित नागरिकांना आवाहन

देशातील अनेक रेल्वे स्थानके स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासाशी निगडित आहेत.

पीटीआय, नवी दिल्ली : देशातील अनेक रेल्वे स्थानके स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासाशी निगडित आहेत. अशा जवळच्या रेल्वे स्थानकाला भेट देऊन स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचे महत्त्व समजून घेण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी नागरिकांना केले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या संदर्भात त्यांनी हे आवाहन केले.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा एक भाग म्हणून, रेल्वेने १८ ते २३ जुलै दरम्यान ‘स्वातंत्र्याची रेल्वेगाडी आणि रेल्वे स्थानक’ सप्ताह साजरा केला. यात देशातील २४ राज्यांतील २७ रेल्वेगाडय़ा आणि ७५ रेल्वे स्थानकांचा समावेश होता. स्वातंत्र्यलढय़ात भारतीय रेल्वेच्या भूमिकेची लोकांना जाणीव करून देणे, हा या प्रयत्नांमागील उद्देश असल्याचे मोदींनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘देशात अशी अनेक रेल्वे स्थानके आहेत, जी स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासाशी निगडित आहेत. या स्थानकांबद्दल जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. या स्थानकांपैकी मोदींनी झारखंडमधील नेताजी सुभाषचंद्र बोस जंक्शन गोमो, लखनौजवळील काकोरी रेल्वे स्टेशन, तामिळनाडूच्या तूत्तुक्कुडि जिल्ह्यातील वान्ची मणियाच्ची जंक्शनचा उल्लेख करून, त्यांचे ऐतिहासिक महत्त्व विशद केले. ही यादी खूप मोठी असल्याचे सांगून ते म्हणाले, की २४ राज्यांत स्वातंत्र्यचळवळीच्या इतिहासाशी संबंधित ७५ रेल्वे स्थानके या अमृतमहोत्सवानिमित्त निवडण्यात आली आहेत.

हे वाचले का?  ‘डिजिटल अरेस्ट’चा मुद्दा पंतप्रधानांकडून अधोरेखित

‘ऐतिहासिक महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगावे’

या ७५ स्थानकांची अतिशय सुंदर सजावट करण्यात आल्याचे सांगून मोदी म्हणाले, की या स्थानकांत अनेक कार्यक्रमही आयोजित केले जात आहेत. नागरिकांनी आपल्या जवळच्या अशा ऐतिहासिक स्थानकाला भेट देण्यासाठी आवर्जून वेळ काढलाच पाहिजे. असे केल्याने नागरिकांना ते आतापर्यंत अनभिज्ञ असलेल्या स्वातंत्र्यचळवळीच्या इतिहासाची सविस्तर माहिती मिळेल. मी अशा ऐतिहासिक स्थानकांजवळच्या शाळांना विनंती करतो, की, शिक्षकांनी त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना अशा स्थानकांवर घेऊन जावे व तेथे घडलेल्या ऐतिहासिक घटनेची माहिती या विद्यार्थ्यांना समजावून सांगावी.

हे वाचले का?  Violence in Manipur : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, इम्फाळ जिल्ह्यात हायटेक ड्रोनने हल्ला; दोन जणांचा मृत्यू, १० जण गंभीर जखमी

रेल्वेच्या विशेष सप्ताहांतर्गत विविध उपक्रम

‘स्वातंत्र्याची रेल्वेगाडी आणि रेल्वे स्थानक’ सप्ताहांततर्गत स्थानकांच्या फलाटावर चित्रफिती दाखवण्यात आल्या. तसेच देशभक्तीपर गीते लावण्यात आली. यादरम्यान संबंधित स्थानकांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी त्या स्थानकाशी संबंधित स्वातंत्र्यलढा विशद करणारे पथनाटय़ सादर करण्यात आले. फुलांनी सुशोभित केलेल्या रेल्वेगाडय़ांना ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. या स्थानकांवर रोषणाई, सजावट, छायाचित्रांची प्रदर्शनेही लावण्यात आली होती.

हे वाचले का?  जागतिक बँकेची भारतावर स्तुतिसुमनं; अध्यक्ष म्हणाले, “इथपर्यंत पोहोचण्यासाठी भारतानं खूप प्रयत्न केल्याचं दिसतंय”!