आमदार लंके यांचा ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये समावेश

आमदार लंके यांनी भाळवणी येथे १ हजार १०० खाटांचे शरदचंद्र पवार आरोग्य मंदिर सुरू केले आहे.

पारनेर : देशात करोना संसर्गाचा शिरकाव झाल्यापासून सतत दीड  वर्षे करोनाबाधितांच्या सेवेत झोकून दिलेल्या आमदार नीलेश लंके यांचा ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडन’ मध्ये समावेश झाला असल्याची माहिती संस्थेच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा फराह सुलतान अहमद यांनी दिली. गुरुवारी दुपारी १ वाजता मुंबई येथे होणाऱ्या कार्यक्रमात आमदार  लंके यांना स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन संस्थेच्या वतीने गौरवण्यात येणार असल्याचे फराह अहमद यांनी कळवले आहे.

‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये समावेश झाल्याने आमदार लंके यांनी करोना संकटकाळात केलेल्या सातत्यपूर्ण कामाला जागतिक परिमाण प्राप्त झाले आहे. करोना संसर्गाच्या काळात उल्लेखनीय काम केलेल्या मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर,अभिनेता सोनू सूद यांचा ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडन’मध्ये यापूर्वीच समावेश झाला आहे.

हे वाचले का?  गणेशोत्सवातील ‘शिधा’ नवरात्रीत; दिवाळीत ‘आनंदा’ला तोटा!

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दीड वर्षांंपूर्वी देशात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या सुरुवातीला परप्रांतीय तसेच परजिल्ह्यातील कामगार, मजूर, तालुक्यात विलगीकरणात असलेल्या नागरिकांसाठी नगर-पुणे रस्त्यावर आमदार लंके यांनी अन्नछत्र सुरू केले होते.दोन महिने अहोरात्र सुरू असलेल्या या अन्नछत्राचा लाभ तब्बल साडेचार लाख लोकांना झाला.अन्नछत्राबरोबरच गावाकडे पायी परतणाऱ्या मजुरांसाठी आश्रयाची सोय करण्यात आली होती. निर्बंध शिथिल झाल्यावर हजारो मजुरांना आपल्या गावी जाण्यासाठी आमदार लंके व त्यांच्या सहकाऱ्यांनी मदत केली.

गेल्या वर्षी जून महिन्यात राज्याच्या ग्रामीण भागात करोना संसर्गाने उच्छाद मांडलेला असताना पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात करोनाबाधितांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली. करोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी आमदार लंके यांनी तालुक्यातील कर्जुलेहर्या येथे कोविड उपचार केंद्र सुरू केले. या उपचार केंद्रात ४ हजार ६६८ बाधितांनी करोनावर मात केली.

संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी आमदार लंके यांनी भाळवणी येथे १ हजार १०० खाटांचे शरदचंद्र पवार आरोग्य मंदिर सुरू केले आहे. मतदारसंघातील तसेच राज्याच्या विविध भागातील बाधितांबरोबरच परराज्यातील करोनाबाधित भाळवणी येथील उपचार केंद्रात दाखल झाले.आजपर्यंत आठ हजारांहून अधिक रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

हे वाचले का?   ‘नीट-यूजी’ परीक्षेत व्यवस्थेला खिंडार नाही ; सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

जग संसर्गाच्या दहशतीखाली असताना भाळवणी येथील कोविड उपचार केंद्रात ‘आनंदी वातावरणात उपचार’ ही संकल्पना राबवण्यात येत आहे.त्यामुळे रुग्णांना मोठा मानसिक आधार मिळाला.करोनाबाधितांच्या सेवेसाठी आमदार लंके आपल्या शेकडो कार्यकर्त्यांंसह उपचार केंद्रात मुक्काम ठोकून आहेत. शेवटचा करोनाबाधित रुग्ण बरा होईपर्यंत उपचार केंद्र सुरू ठेवण्याचा निर्धार आमदार लंके यांनी केला आहे.आमदार लंके करोना संसर्गाच्या काळात करीत असलेल्या कामाची देशात चर्चा झाली. उत्तरप्रदेश सरकारने आमदार लंके यांच्या कामाची दखल घेत कोविड उपचार केंद्रातील उपचारांची,व्यवस्थापनाची माहिती घेतली.आमदार लंके यांनी केलेल्या या कामाची दखल घेत त्यांचा समावेश ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडन’मध्ये केला आहे.

हे वाचले का?  Budget 2024 Tax Slab : टॅक्स स्लॅबमध्ये नोकरदारांना मोठा दिलासा मिळणार? ओल्ड टॅक्स रिजिमवाल्यांनाही फायदा?

देशातील पहिले आमदार

‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये समावेश झालेले नीलेश लंके देशातील पहिले आमदार ठरले आहेत.‘आयर्न मॅन’ किताब पटकावणारे पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांचा समावेश ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये झाला. ते हा सन्मान मिळणारे देशातील पहिले सरकारी अधिकारी आहेत.