आमदार संतोष बांगर यांनी मारहाण का केली? व्यवस्थापकानं दिलं स्पष्टीकरण; सर्व आरोपही फेटाळले, म्हणाले…

मारहाण झालेले व्यवस्थापक शुभम हरण यांनी प्रतिक्रिया दिली असून संतोष बांगर यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत कामगारांना जेवणाचे डब्बे पुरवणाऱ्या गोडाऊनच्या व्यवस्थापकाला मारहाण केली आहे. शुभम हरण असं मारहाण झालेल्या व्यवस्थापकाचं नाव आहे. मारहाण होतानाचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी संतोष बांगर यांच्या कृत्याचा निषेध केला आहे. या सर्व घटनाक्रमानंतर गोडाऊनचे व्यवस्थापक शुभम हरण यांनी प्रतिक्रिया दिली असून संतोष बांगर यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ते ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

हे वाचले का?  Sanjay Raut : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला काय? संजय राऊत म्हणाले, “आमचं ठरलंय जो..”

घडलेल्या प्रकाराबाबत स्पष्टीकरण देताना शुभम हरण म्हणाले की, सकाळी दहा साडे दहाची वेळ होती. त्यावेळी आम्ही उरलेलं टाकाऊ अन्न एमआयडीसीमधील एका कचरा डेपोत टाकण्यासाठी घेऊन जात होतो. हे टाकाऊ अन्न घेऊन जात असताना आमदार संतोष बांगर यांनी गोडाऊनला भेट दिली. तुम्ही लोकांना निकृष्ट दर्जाचं अन्न खाऊ घालता, त्यांच्या जीवाशी खेळता, असे आरोप बांगर यांनी केले. त्यासाठी त्यांनी काही व्हिडीओ देखील दाखवले, पण त्या व्हिडीओत दिसणारं अन्न गोडाऊनच्या बाहेरील असून ते उरलेले टाकाऊ पदार्थ होते. जे आम्ही कचऱ्यात टाकून देणार होतो. याच अन्नाचा व्हिडीओ दाखवून बांगर यांनी मारहाण केली.

हे वाचले का?  Ravikant Tupkar : “…तर सत्ताधारी नेत्यांना फिरणं मुश्किल होईल”, रविकांत तुपकरांचा सरकारला पुन्हा इशारा

बांगर यांनी केलेल्या आरोपांबाबत विचारलं असता, व्यवस्थापक शुभम हरण यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी सांगितलं की, “असा कुठलाही प्रकार येथे घडत नाही. ठरल्याप्रमाणे आम्ही कामगारांना जेवण देतो. जे जेवण देतो, तेही व्यवस्थित देतो. जेवणाबाबत आमच्याकडे अद्याप कोणतीही तक्रार आली नाही. पण साहेबांनी जे आरोप लावले आहेत, याबाबतचं स्पष्टीकरण मला माहीत नाही.”

मारहाण झाल्याबाबत तक्रार देणार का? असं विचारलं असता, हरण म्हणाले, “तक्रार वगैरे देण्याचा काहीही विचार नाहीये. कारण मला मारहाण झाली आहे, हे महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलं आहे.मारहाण होणं मला अपेक्षित नव्हतं. पण त्यांनी मला मारलंय, यावर आता मी काय बोलू…”

हे वाचले का?  Nana Patole : “काँग्रेसमध्ये नानाभाऊ-विजयभाऊ; एकमेकांना फाडून खाऊ अशी स्थिती”, जुन्या सहकाऱ्याची बोचरी टीका