इगतपुरीत ‘रेव्ह पार्टी’वर पोलिसांचा छापा, २२ जण ताब्यात

घटनास्थळावरून अमली पदार्थासह चित्रीकरण कॅमेरा, ‘ट्रायपॉड’ आदी साहित्य जप्त करण्यात आले.

चित्रपट क्षेत्रातील तरुणींचा समावेश

नाशिक : इगतपुरी तालुक्यात रेव्ह पार्टीचे प्रकरण उघडकीस झाले आहे. खासगी बंगल्यातील या पार्टीत अमली पदार्थाचे सेवन करताना २२ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, यात १२ महिलांचा समावेश आहे. यातील पाच ते सहा तरुणी चित्रपट क्षेत्राशी संबंधित आहेत. या पार्टीसाठी अमली पदार्थ पुरविणाऱ्या नायजेरियन नागरिकास मुंबईतून ताब्यात घेण्यात आले.

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील कसारा घाटानजीकच्या एका खासगी बंगल्यात रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रविवारी पहाटे छापा टाकला. स्काय ताज व्हिला आणि स्काय लगून व्हिला या दोन बंगल्यात संशयित कोकेनसारखे अमली पदार्थ, हुक्क्याचे सेवन करताना मद्यधुंद अवस्थेत आढळले. घटनास्थळावरून अमली पदार्थासह चित्रीकरण कॅमेरा, ‘ट्रायपॉड’ आदी साहित्य जप्त करण्यात आले.

हे वाचले का?  सप्तश्रृंग गड रस्त्यावरील खड्ड्यांमुळे भाविकांचे हाल

दुपारी संशयितांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. प्राथमिक चौकशीत पार्टीसाठी अमली पदार्थ मुंबईतून आणल्याचे उघड झाले. त्याआधारे मुंबई येथून एका नायजेरियन नागरिकास ताब्यात घेण्यात आले. इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. इगतपुरी येथील काही हॉटेलमध्ये यापूर्वी रेव्ह पार्टी झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. अशा पार्टीसाठी हॉटेलऐवजी आता खासगी बंगल्यांचा आधार घेतला जात असल्याचे या घटनेतून उघड झाले.

हे वाचले का?  भुसावळ – सुरत रेल्वेसेवा विस्कळीत, चिंचपाडा स्थानकात रेल्वे रुळावर मातीचा भराव, मालवाहू गाडी रुतली

दरम्यान, संशयितांमधील काही महिला दाक्षिणात्य चित्रपट क्षेत्राशी संबंधित आहेत. एक ‘बिग बॉस’ या मालिके तील स्पर्धक आहे. दोन युवती नृत्य दिग्दर्शक असून एका इराणी महिलेचाही समावेश आहे. संशयितांची नांवे पोलिसांनी सायंकाळी उशिरापर्यंत जाहीर केलेली नव्हती.

इगतपुरीतील दोन खासगी बंगल्यात अवैधरित्या अमली पदार्थाची पार्टी सुरू असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे पोलिसांनी कारवाई करून २२ संशयितांना ताब्यात घेतले. घटनास्थळावरून कोकेनसह अन्य अमली पदार्थ जप्त करण्यात आले. पार्टी आयोजनात सहकार्य करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. पार्टीसाठी अमली पदार्थ पुरविणाऱ्या नायजेरियन नागरिकास मुंबईतून ताब्यात घेण्यात आले आहे.

हे वाचले का?  सप्तश्रृंग गड रस्त्यावरील खड्ड्यांमुळे भाविकांचे हाल

      – सचिन पाटील, पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण