इराकमध्ये रॉकेट हल्ला; अमेरिकन दुतावास होतं मुख्य टार्गेट

सुदैवाने हल्ल्यात हानी झालेली नाही

बगदादमध्ये जोरदार तटबंदी असणाऱ्या ग्रीन झोनमध्ये रॉकेट हल्ला करण्यात आल्याची माहिती इराकच्या लष्कराने दिली आहे. सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. एपीने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकन दुतावासाला लक्ष्य करत हा हल्ला करण्यात आला असल्याची माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली आहे.

नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दोन सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रीन झोनवर तीन रॉकेटच्या सहाय्याने हल्ला करण्यात आला. यामधील एक रॉकेट अमेरिकन दुतावासाच्या कॉम्प्लेक्समध्ये पडलं होतं. लष्कराने या हल्ल्यानंतर निवेदन प्रसिद्ध केलं असून हल्ल्यात कोणतीही हानी झालेली नसून तपास सुरु असल्याची माहिती दिली आहे. हल्ल्यात संपत्तीचं तसंच काही वाहनांचं नुकसान झालं आहे. ग्रीन झोनमध्ये अनेक देशांचे दुतावास आहेत.

हे वाचले का?  इस्रायलवरील हल्ल्याची वर्षपूर्ती; पूर्वसंध्येला लेबनॉन लक्ष्य, तर हेझबोलाकडूनही प्रतिहल्ला!

इराकमध्ये अमेरिकेला टार्गेट करत करण्यात आलेला हा एका आठवड्यातील तिसरा हल्ला आहे. गेल्या मंगळवारी इरबील आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या रॉकेट हल्ल्यात एक कंत्राटदार आणि काही स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर शनिवारी अमेरिकेच्या सुरक्षा कंपनीसाठी काम करणारे कर्मचारी रॉकेट हल्ल्यात जखमी झाले होते.