भारतीय तटरक्षक दलाने दोन गस्त घालणाऱ्या जहाजांद्वारे ही कारवाई केली आहे.
भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांनी गुजरातच्या कच्छमध्ये मोठी कारवाई केली आहे. इंडियन कोस्ट गार्डने ओखा जवळ एका इराणी नावेतून ४२५ कोटींचं ड्रग्ज जप्त केलं आहे. ६१ किलोंचं हेरॉईन या बोटीतून तस्करी करत नेलं जात होतं. गुजरात अँटी टेरिरीस्ट स्क्वाडला बोटीतल्या ड्रग्जबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर भारतीय तटरक्षक दलाने दोन गस्त घालणाऱ्या जहाजांद्वारे ही कारवाई केली आहे.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार रात्री उशिरा ओखा किनाऱ्यापासून ३४० किमी दूर एका बोटीत भारताच्या जल सीमा क्षेत्रात एक संशयित बोट दिसली. आयसीजीच्या जहाजांनी त्या बोटीला थांबण्यास सांगितलं. मात्र तेव्हा इराणी बोटीच्या चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी तटरक्षक दलाने ही महत्त्वाची कारवाई केली. NDTV ने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.
कोस्ट गार्डच्या बोटीने इराणी बोटीचा पाठलाग केला. त्यानंतर आयसीजीच्या जहाजांनी या बोटीला घेरलं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या बोटीत इराणी नागरिक होते. त्यांच्याकडे इराणची नागरिकता असल्याचा पुरावा मिळाला आहे. पाच सदस्य आणि चालकासह ही इराणी नाव पकडण्यात आली आहे. या पाचही जणांना अटक करण्यात आली आहे. या बोटीवर ६१ किलो हेरॉईन होतं जे जप्त करण्यात आलं आहे. या आरोपींना ओखा या ठिकाणी नेण्यात आलं आहे.