उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन

परीक्षांच्या तारखा बदलण्याच्या मागणीसाठी परीक्षार्थींनी सोमवारी ‘यूपीपीएससी’ मुख्यालयाला घेराव घातल्यानंतर मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले.

प्रयागराज : उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगातर्फे (यूपीपीएससी) आयोजित केल्या जाणाऱ्या छाननी अधिकारी-सहाय्यक छाननी अधिकारी (आरओ-एआरओ) आणि राज्य नागरी सेवा (पीसीएस) या परीक्षा वेगवेगळ्या दिवशी घेतल्या जात असून त्या एकाच दिवशी घ्याव्यात या मागणीसाठी प्रयागराज येथील उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाच्या मुख्यालयाबाहेर सोमवारपासून निदर्शने सुरू आहेत. मंगळवारीही ही निदर्शने सुरू राहिली.

परीक्षांच्या तारखा बदलण्याच्या मागणीसाठी परीक्षार्थींनी सोमवारी ‘यूपीपीएससी’ मुख्यालयाला घेराव घातल्यानंतर मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले. त्यांना पांगवण्यासाठी मोठ्या प्रमाणात राज्य पोलीस तैनात करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या मागण्यांसंबंधी जिल्हा न्यायदंडाधिकारी आणि पोलीस आयुक्तांनी सोमवारी उशिरा त्यांच्याबरोबर बैठक घेतली. पण ती निष्फळ ठरली. त्यानंतर बहुसंख्य परीक्षार्थी निदर्शकांनी आंदोलनस्थळी उघड्यावर रात्र काढली. तर जे रात्री घरी गेले होते ते मंगळवारी सकाळी आयोगाच्या प्रवेशद्वाराजवळ पुन्हा जमले. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘आम्ही माघार घेणार नाही, न्याय मिळेपर्यंत एक राहू’, ‘एक दिवस, एक परीक्षा’ यासारख्या घोषणा लिहिलेले फलक झळकावले.

हे वाचले का?  “हिंदुंनो परत जा”, अमेरिकेत मंदिराची विटंबना; दहा दिवसांतील दुसरी घटना

दरम्यान, समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने राज्य सरकारवर टीका केली आहे. निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीमार करणे दुर्दैवी असल्याचे काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हटले आहे. तर, राज्य लोकसेवा आयोगाने या परीक्षार्थींचे म्हणणे ऐकून घ्यावे अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली. दुसरीकडे, परीक्षांचे पावित्र्य कायम ठेवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्याचे आयोगाच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

हे वाचले का?  Student Suicides Report: विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमध्ये महाराष्ट्र आघाडीवर; शेतकऱ्यांपेक्षाही अधिक संख्या, धक्कादायक अहवाल

भाजपच्या पराभवानंतरच रोजगारनिर्मिती शक्य!

लखनऊ : भाजप सत्तेवरून पायउतार झाल्यावरच नोकऱ्यांची निर्मिती होऊ शकेल अशी टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली आहे. ‘‘भाजप सरकार ज्या उत्साहाने अन्यायाचा बुलडोझर चालवत आहे त्याच उत्साहाने त्यांनी कारभार केला असता तर ही वेळ आली नसती,’’ अशी टीका त्यांनी केली. अनेक वर्षे एकतर पदांची निर्मिती केली गेली नाही किंवा परीक्षा प्रक्रिया लांबवण्यात आली असे यादव यांनी ‘एक्स’वर लिहिले आहे.

हे वाचले का?  Jhansi Fire: झाशीमध्ये हाहाकार! रुग्णालयाच्या आगीत १० नवजात अर्भकांचा होरपळून मृत्यू, योगी आदित्यनाथांकडून शोक व्यक्त