मान्सून परतीच्या वाटेला लागला असतानाच एक नाही तर दोन चक्रीवादळाचे संकट घोंगावत आहे.
नागपूर : मान्सून परतीच्या वाटेला लागला असतानाच एक नाही तर दोन चक्रीवादळाचे संकट घोंगावत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे त्याठिकाणी चक्रीवादळ तयार होत आहे. तर त्यापाठोपाठ बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे.
पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात अरबी समुद्राच्या तापमानात वाढ होते. त्यामुळे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता असते. आता मान्सून परतीच्या वाटेवर असतानाच अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. १६ ऑक्टोबरला दक्षिण पूर्व अरबी समुद्र आणि लगतच्या लक्षद्वीप परिसरात चक्राकार वारे तयार झाले आहेत. तर १८ ऑक्टोबरला कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून येत्या काही तासांत दक्षिण पूर्व अरबी समुद्र आणि पूर्व मध्य अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे.
मान्सूननंतरचे हे पहिले चक्रीवादळ असेल. यानंतर पश्चिम ते उत्तर पश्चिम दिशेने सरकत जाऊन २१ ऑक्टोबरला मध्य अरबी समुद्रात चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. सध्या हे चक्रीवादळ २०-३० किलोमीटर प्रतितास वेगाने पुढे सरकत आहे. पण, चक्रीवादळ कुठल्या दिशेने जाणार याची दिशा अद्याप स्पष्ट झालेली नाही. अरबी समुद्रासोबतच बंगालचा उपसागर आणि लगतच्या अंदमानजवळ १७ ऑक्टोबरला चक्राकार वारे तयार झाले. हे चक्राकार वारे पश्चिम-उत्तर पश्चिम दिशेने सरकत जाऊन २० ऑक्टोबरला कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल. त्यानंतर २४ ऑक्टोबरपर्यंत बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळदेखील कोणत्या दिशेने जाणार हे अद्याप स्पष्ट नाही.