एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन अनेक ठिकाणी सुरूच, आंदोलन मागे घेण्याचे एसटी कर्मचारी कृती समितीचे आवाहन ठरले फोल

राज्यात अनेक ठिकाणी आजही एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु, प्रवाशांचे हाल कायम

गुरुवारी संध्याकाळी परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचारी कृती समितीबरोबर बैठक घेत कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य केल्या. तर काही मागण्यांचा दिवाळीनंतर विचार करण्यात येईल असं परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केलं, आंदोलन मागे घेण्याचे आवाहनही केलं. एसटी कर्मचारी कृती समितीनेही आंदोलन मागे घेत असल्याच जाहीर केलं.

तेव्हा आजपासून राज्यातील एसटी वाहतुक सेवा सुरळित सुरु होईल अशी अपेक्षा होती. मात्र आजही राज्यात अनेक एसटी डेपोच्या ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. एसटी कर्मचारी कृती समितीबाबत नाराजी व्यक्त करत आंदोलन मागे घेण्यास एसटी कर्मचाऱ्यांनी नकार दिला आहे. विशेषतः सोलापूर, कोल्हापूर, बीड, धुळे या जिल्ह्यांतील विविध एसटी डेपोच्या ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा जोर तीव्र आहे. राज्यात इतरही ठिकाणी तुरळक का होईना एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. त्यातच नगर जिल्ह्यातील शेगाव डेपो मध्ये एसटी कर्मचाऱ्याने केलेल्या आत्महत्येमुळे आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संतापात भर पडली आहे. या आंदोलनाचा फटका संबंधीत जिल्ह्यात सर्वसामान्यांना बसला असून म्हणावी तेवढी एसटी सेवा राज्यात सुरळित सुरु झालेली नाही. तेव्हा यावर आता कसा तोडगा निघणार, आंदोलन किती दिवस चालणार याकडे सर्वाचे लक्ष लागून राहीलेलं आहे.

हे वाचले का?  भाजपा उमेदवारांची यादी जाहीर होताच पहिली बंडखोरी? श्रीगोंद्यात सुवर्णा पाचपुतेंचा निर्धार, “पक्षाला ताकद दाखवणार”