औद्योगिक कंपनीसह दुकानास आग

शहरातील सातपूर औद्योगिक वसाहतीत एका कंपनीसह सिन्नर येथे पादत्राणांच्या दुकानास लागलेल्या आगीत ५० लाखांपेक्षा अधिकची वित्तहानी झाली आहे.

मोठय़ा प्रमाणावर वित्तहानी

नाशिक : शहरातील सातपूर औद्योगिक वसाहतीत एका कंपनीसह सिन्नर येथे पादत्राणांच्या दुकानास लागलेल्या आगीत ५० लाखांपेक्षा अधिकची वित्तहानी झाली आहे. अग्निशमन बंबांनी अथक प्रयत्न करून आग विझविल्याने परिसरात ती पसरू शकली नाही. सातपूर येथील औद्योगिक वसाहतीत शीतल संघवी यांची निलराज इंडस्ट्री ही कंपनी आहे. कंपनीत कपॅसिटर तयार करण्यात येते. बुधवारी पहाटे ५ ते साडेपाचच्या सुमारास कंपनीच्या आतील भागात अकस्मात आग लागलीहा प्रकार कामावर असणाऱ्या कामगारांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने बाहेर धाव घेतली. कंपनीत प्लास्टिक, अ‍ॅल्युमिनियम, चांदीच्या पट्टय़ा असल्याने त्यांनी चटकन पेट घेतला. सातपूर अग्निशमन केंद्र, औद्योगिक वसाहत परिसरातून एक तसेच मिहद्रा कंपनीचा एक, अग्निशमन विभाग मुख्यालय तसेच सिडको केंद्र येथून सहा असे बंब घटनास्थळी दाखल झाले. पहाटे सव्वापाचपासून सुरू झालेले आग विझविण्याचे प्रयत्न सकाळी १० पर्यंत सुरू होते. आगीत कंपनीचा पहिला मजला संपूर्ण खाक झाला. कपॅसिटर बनविण्यास लागणारा कच्चा माल जळाला. आगीची झळ अन्य कंपन्यांपर्यंत पोहोचली नाही. आग कोणत्या कारणाने लागली याविषयी अस्पष्टता आहे. आर्थिक नुकसान ५० लाखांहून अधिक रुपयांचे असले तरी जीवितहानी झालेली नाही. आगीची दुसरी घटना सिन्नर येथे घडली. सिन्नर येथील छत्रपती शिवाजी चौकातील चेतन सातपुते यांच्या सिन्नर फुटवेअर या पादत्राणांच्या दुकानाला बुधवारी सकाळी आग लागली. पहाटेच्या सुमारास दुकानातून धूर निघत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी हा प्रकार अग्निशमन विभागाला कळवला. नगर परिषद आणि सिन्नर औद्योगिक वसाहतीचे अग्निशमन केंद्रातील असे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले.

सातपुते यांचे या ठिकाणी तीन गाळे असून तीनही गाळय़ांमध्ये पादत्राणे होती. त्यातील एका गाळय़ाचा दरवाजा आतून बंद असल्याने आग त्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर भडकली. अग्निशमनच्या कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडत आगीवर नियंत्रण मिळवले. तोपर्यंत सर्व माल जळून खाक झाला. चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आली. भर चौकात दुकानाला आग लागल्यामुळे अन्य दुकानांनाही आग लागण्याचा धोका होता. मात्र अग्निशमन विभागाच्या प्रयत्नांमुळे आग पसरू शकली नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.