करोनाच्या अपुऱ्या उपायांमुळे राज्यात हजारो बळी

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री केंद्राने जीएसटी थकवल्याचा आरोप करीत आहेत.

माधव भंडारींची महाविकास आघाडीवर टीका

नाशिक : करोनाशी लढण्यासाठी केंद्र सरकारने सर्वाधिक निधी महाराष्ट्राला दिला. तरीदेखील महाविकास आघाडी सरकार उपाययोजना करू शकले नाही. नियोजन अपुरे पडले. त्यामुळेच राज्यात ४६ हजार रुग्णांचे बळी गेले. केंद्र्राने दिलेल्या निधीचा विनियोग राज्य सरकारने कसा केला हे एकदा जाहीर करावे, असे आव्हान भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी दिले.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर, मंगळवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत भंडारी यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीकास्त्र सोडले. महाविकास आघाडीच्या ताब्यात सत्ता आल्यापासून महाराष्ट्राची सर्व क्षेत्रांत पीछेहाट होत आहे. आघाडी सरकारने महाराष्ट्राला अडीच दशके मागे नेऊन ठेवले. करोनाच्या लढाईत राज्य सरकारला पुरेशा उपाययोजना करता आल्या नाहीत. केंद्राने मोठ्या प्रमाणात निधी देऊनही हे घडले असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

हे वाचले का?  Shivaji Maharaj Statue : शिवछत्रपतींचा पुतळा कोसळल्यानंतर नौदल व राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडवर, नव्या पुतळ्यासाठी योजना तयार

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री केंद्राने जीएसटी थकवल्याचा आरोप करीत आहेत. हा आरोप दिशाभूल करणारा असल्याचे ते म्हणाले. मुळात जीएसटीची ५० टक्के रक्कम ही राज्याची राज्याकडेच असते. केवळ केंद्र शासनाच्या भरपाईचा मुद्दा आहे. त्यातही केंद्र शासनाने सर्व राज्यांना अल्प मुदतीचे कर्ज काढण्यास सुचविले आहे. त्याची हमी केंद्र सरकार घेणार आहे. राज्यातील उद्योग अन्य राज्यात स्थलांतरित होत आहेत. उद्योग पळवून नेल्याचा महाविकास आघाडीकडून केला जाणारा आरोप म्हणजे स्वत:चे अपयश झाकण्याचा प्रयत्न असल्याचे भंडारी यांनी सांगितले.

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकावरून देशासह राज्यात आंदोलने सुरू आहेत. महाविकास आघाडीने ही विधेयके शेतकरीविरोधी असल्याचा आक्षेप नोंदविला. याबाबतच्या प्रश्नावर भंडारी यांनी हा राज्य सरकारचा दुटप्पीपणा असल्याचा आरोप केला. केंद्र शासनाच्या कृषी विधेयकांना शेतकरीविरोधी म्हणणाऱ्या राज्य सरकारने राज्यात कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकऱ्यांच्या मतदानाचा अधिकार काढून घेतल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. आरक्षणाच्या मुद्यावरून सुरू असलेल्या आंदोलनांना भाजपची फूस असल्याचा आरोपही त्यांनी फेटाळला. राज्यात भाजपची सत्ता असतानाही अशाच प्रकारे आंदोलने सुरू होती. तेव्हा कोणी असे आरोप केले नव्हते, हा दाखला त्यांनी दिला. यावेळी प्रदेश सरचिटणीस आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, लक्ष्मण सावजी आदी उपस्थित होते.

हे वाचले का?  IPS भाग्यश्री नवटाकेंचा पाय आणखी खोलात? १२०० कोटींच्या घोटाळ्याच्या चौकशीप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल

मग खडसेंनी काय केले ?

भाईचंद हिराचंद रासयोनी (बीएचआर) पतसंस्थेची ११०० कोटींची मालमत्ता मातीमोल भावात विकल्याचा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केलेल्या आरोपावर भंडारी यांनी खडसेंवर टीकास्त्र सोडले. बीएचआरचा घोटाळा बाहेर आला, तेव्हा खडसे हे मंत्रीच होते. त्यांनी काय केले, असा प्रश्न भंडारी यांनी उपस्थित केला. पतसंस्थेतील घोटाळ्याच्या चौकशीसाठी तत्कालीन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे वारंवार मागणी करूनही काही झाले नसल्याचा आरोप खडसेंनी केला आहे. खडसेंना सर्व आरोप करू द्या, मग भूमिका मांडू, असे भंडारी यांनी सांगितले.

हे वाचले का?  पाऊले चालती तुळजापूरची वाट…; कोजागरीनिमित्त शेकडो भाविकांनी रस्ते फुलले