करोनाच्या झपाट्याने प्रसारामागे युरोप, दुबईतील विषाणू

गृह विलगीकरणातील व्यक्ती बाहेर फिरतांना आढळल्यास कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.

करोनाच्या ५८ केंद्रांवर विशेष लक्ष

नाशिक : करोनाचा झपाट्याने प्रसार होण्यामागे युरोप आणि दुबई येथे आढळलेल्या विषाणूचा नवीन प्रकार कारणीभूत ठरल्याचे उघड झाले आहे. स्थानिक पातळीवरील २६ नमुने राष्ट्रीय विषाणूजन्य प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील ३० टक्के नमुने हे युरोप, दुबईमधील विषाणूचे असल्याचे उघड झाले. गृह विलगीकरणातील व्यक्तींमुळे कुटुंबातील इतर सदस्य बाधित होत असल्याने स्वतंत्र खोली नसणाऱ्यांना काळजी केंद्र, रुग्णालयात रवाना केले जाणार आहे. गृह विलगीकरणातील व्यक्ती बाहेर फिरतांना आढळल्यास कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.

गेल्या वर्षी करोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून एकाच दिवसात आतापर्यंतची सर्वाधिक म्हणजे दोन हजाराहून अधिकचा टप्पा ओलांडणारी रुग्णवाढ नोंदविली गेली. नाशिक, मालेगावसह मुख्यत्वे शहरी भागात करोनाचा वेगाने प्रसार होत आहे.

हे वाचले का?  अनुसूचित जमातींमधून आरक्षणासाठी धनगर समाजाचे आंदोलन

आदल्या दिवशी २१९३ रुग्ण आढळले. यातील नाशिक शहरात १२९६, नाशिक ग्रामीणमध्ये ६३१ आणि मालेगाव महापालिका क्षेत्रातील १७४ रुग्णांचा समावेश आहे. मागील काही दिवसात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आठ दिवसांवर आला आहे. करोनाच्या आढावा बैठकीनंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नव्या विषाणूमुळे मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी त्याचा प्रसाराचा वेग प्रचंड असल्याचे सांगितले. त्यामुळे नागरिकांनी स्वत:हून नियम पाळणे गरजेचे असल्याची जाणीव त्यांनी करून दिली. नियमांचे पालन न झाल्यास कठोर कारवाईच्या सूचना यंत्रणेला देण्यात आल्या आहेत.

सध्या जिल्ह्यात जवळपास ११ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील ९० टक्के रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. संबंधितांनी अधिक दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. लहानसे घर असल्यास विलगीकरण शक्य नाही. एकामुळे कुटुंबातील इतर सदस्यांमध्ये प्रादुर्भाव होत आहे. ज्यांच्या घरी स्वतंत्र खोली आहे, त्यांना एकवेळ विलगीकरण करता येईल. लहानशा घरात सदस्य संख्या अधिक असल्यास ते शक्य नाही. तरीदेखील अनेक रुग्ण घरात राहतात. रुग्णसंख्या वाढण्यामागे ते देखील एक कारण आहे. त्यामुळे गृह विलगीकरणातील रुग्ण कुठे राहतात याची पडताळणी करून सोय नसल्यास संबंधितांना रुग्णालय किं वा हॉटेलमध्ये पाठविले जाईल. गृह विलगीकरणातील व्यक्ती बाहेर फिरताना आढळल्यास पोलीस, महापालिकेने कठोर कारवाई करावी, असे सूचित करण्यात आले.

हे वाचले का?  नाशिक फाटा-खेड महामार्गासाठी ८ हजार कोटी; केंद्राकडून महत्त्वाकांक्षी ८ प्रकल्पांना मंजुरी  

नाशिक शहरात ८० टक्के रुग्ण

करोनाचा वेगाने प्रसार होणारी शहर, ग्रामीण भागात ५८ केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. करोनाचा वेगाने फैलाव शहरी भागातच होत आहे. नव्याने सापडणाऱ्या रुग्णांमध्ये ८० टक्के नाशिक शहरातील आहेत. १० टक्के रुग्ण लहान शहरांत तर १० टक्के रुग्ण हे ग्रामीण भागात आढळतात.  ग्रामीण भागात गृह विलगीकरणातील रुग्णांवर भ्रमणध्वनीद्वारे लक्ष दिले जाते. बाहेर फिरणाऱ्या १५ रुग्णांना यंत्रणेने पकडून रुग्णालयात दाखल के ले. शहरी भागात सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र निर्माण करून या विषाणुची साखळी तोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

हे वाचले का?  ५० कोटींच्या कर्जांसाठी लाखोंचा खर्च, प्रदीर्घ काळापासून एकच लेखा परीक्षक – मविप्र वार्षिक सभेत गोंधळ