करोनावर टाळेबंदी हा कायमस्वरुपी उपाय नाही – डॉ. संजय ओक

राज्याच्या करोना टास्क फोर्सचे प्रमुख तथा प्रसिद्ध शल्य चिकित्सक डॉ. संजय ओक यांनी व्यक्त केले मत

नाशिक : करोनावर टाळेबंदी हा कायमस्वरुपी उपाय नाही. त्याने केवळ प्रसाराची शक्यता कमी करता येते. करोनावर प्रतिबंधाचे ते साधन आहे, असे मत राज्याच्या करोना टास्क फोर्सचे प्रमुख तथा प्रसिद्ध शल्य चिकित्सक डॉ. संजय ओक यांनी व्यक्त केले. येथील दवप्रभा फिल्म अ‍ॅण्ड प्रॉडक्शनच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी आयोजित ज्येष्ठ लेखिका तथा शिक्षणतज्ज्ञ भावना भार्गवे स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते.

हं.प्रा.ठा. महाविद्याालयाच्या उपप्राचार्या प्रा. डॉ. वृन्दा भार्गवे यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी डॉ. ओक यांनी विविध मुद्याांचा उहापोह केला. दोन मास्क, चेहऱ्यावरील आवरण (फेसशिल्ड) आणि निर्बंध हेच आता सामान्यांचे आयुष्य राहणार काय, या प्रश्नावर डॉ. संजय ओक म्हणाले, “करोनाचे नवीन प्रकार आल्यामुळे संसर्गाची धास्ती वाढली, गेल्या फेब्रुवारीत दुसरी लाट दिसू लागली. तेव्हा दोन मास्क परिधान करण्याचा विषय आल्याचे नमूद केले. टाळेबंदी हे नेमके उत्तर नाही. पण निर्बंध न लावता सर्व खुले करणे संसर्गास कारक ठरू शकते. आता निर्बंध देखील तितकेसे कठोर राहिलेले नाहीत. लहान प्रतिबंधक क्षेत्र तयार केली जातात. राज्यातील सात जिल्ह्याात प्रादुर्भाव आहे, त्यामुळे तिथे निर्बंध ठेऊन अन्य भाग खुले करण्याची क्षमता राज्य बाळगून आहे.”

हे वाचले का?  Samruddhhi Highway : समृद्धी महामार्गावरील ८ किमीच्या बोगद्याची खासियत, इगतपुरी ते कसारा अंतर अवघ्या १० मिनिटांत कापलं जाणार

दोन्ही लसी घेतल्या तरी करोना होऊ शकतो

“करोनाचे निदान केवळ आरटीपीसीआर चाचणीने व्हायला हवे. दोन्ही लसी घेतल्या तरी करोना होऊ शकतो. परंतु, लस घेतल्यानंतर होणारा करोना सौम्य स्वरूपाचा असतो. बहुतेकांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येत नाही. प्राणवायू वा अतिदक्षता विभागात उपचाराची वेळ येत नाही. लसीकृत होणे म्हणजे सामूदायिक प्रचारशक्ती निर्माण करण्यास हातभार लावणे. करोना उपचारात औषधांचा धरसोडपणा झाला नाही. उपचारात जी औषधे वापरली गेली, ती इतर आजारांसाठी आधीपासून वापरात आहे. राज्यात उभारल्या जाणाऱ्या प्राणवायू प्रकल्पांमुळे शासकीय रुग्णालयांसह अन्य रुग्णालयांची क्षमता वाढणार,” असल्याचे डॉ. संजय ओक यांनी नमूद केले.

हे वाचले का?  नाशिक : माजी नगरसेविकेच्या घरी चोरी, एक कोटीहून अधिक रकमेचे दागिने लंपास