करोना योद्ध्यांच्या रक्षणार्थ सक्रिय पुढाकार

पहिल्या लाटेत काहीसा सुरक्षित राहिलेला आदिवासी परिसर दुसऱ्या लाटेच्या विळख्यात सापडला.

नाशिकमधील ‘सोशल नेटवर्किंग फोरम’चा उपक्रम

नाशिक : सर्वसामान्य नागरिकांचे, त्यातही दुर्गम भागातील आदिवासींचे करोना संसर्गापासून संरक्षण करण्यासाठी अत्यल्प मानधनावर जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आशा कार्यकत्र्या, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची काळजी कोणीतरी घ्यायला हवी, पण कोणीतरी म्हणजे नक्की कोणी? असा प्रश्न दुसऱ्या लाटेत उभा राहिला. त्याचे उत्तर नाशिकमधील ‘सोशल नेटवर्किंग फोरम’ या संस्थेने कृतीतून दिले आहे. आदिवासी पाड्यांपासून काश्मीरपर्यंत संस्थेने मदत पोहोचवली आहे.

पहिल्या लाटेत काहीसा सुरक्षित राहिलेला आदिवासी परिसर दुसऱ्या लाटेच्या विळख्यात सापडला. आशा कार्यकत्र्या, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्यावर सरकारने करोना नियंत्रणाची बरीच कामे सोपवली, पण सुरक्षा साधने दिली नाहीत. परिणामी, घरोघरी सर्वेक्षण, तापमापन करताना त्यापैकी अनेक बाधित झाले. परिसरातील करोना उपचार केंद्रांतही आरोग्य सेवक, परिचारिका संरक्षक संचाविना (पीपीई किट) काम करीत होते. ‘सोशल नेटवर्किंग फोरम’ने त्यांना संरक्षक संच देण्याचे ठरवले.

करोना नियंत्रण आणि उपचार या दोन्ही आघाड्यांवर काम करणाऱ्या योद्ध्यांचे रक्षण करण्यासाठी फोरमने दानशुरांना आवाहन केले. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. पाच तालुक्यांतील आशा, अंगणवाडी सेविका, मदतनीस, पोलीस अशा सुमारे पाच हजार जणांना चेहरा संरक्षक (फेसशिल्ड), मुखपट्टी, सॅनिटायझर आदी संरक्षक साधने देण्यात आली.

या भागात नऊ करोना उपचार केंद्रे आहेत. तेथील परिचारिका, आरोग्य सेवक हेही  संरक्षक संचाविना काम करीत होते. हे फोरमच्या निदर्शनास आल्यावर संस्थेचे कार्यकर्ते  त्यांच्या मदतीसाठी सरसावले. संस्थेने या सर्व केंद्रांवरील कर्मचाऱ्यांना आणि मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या युवकांनाही संरक्षक संच दिले. त्याचबरोबर या केंद्रातील सुमारे ११०० खाटांसाठी प्रत्येकी एक यानुसार ११०० वाफेची यंत्रे देण्यात आली. या काळात संस्थेचे संस्थापक प्रमोद गायकवाड, डॉ. प्रशांत बच्छाव, रामदास शिंदे, संदीप बत्तासे, जगदीप गायकवाड, डॉ. नीलेश पाटील, विजय भरसट, संदीप डगळे हा संच अहोरात्र कार्यरत होता. या उपक्रमात देश-परदेशातून मदत मिळाली. अमेरिकेतील रिअल डायनॅमिक्स, जीएसटी अधिकारी संघटना, रचना ट्रस्ट, एबीबी यांच्यासह २०० वैयक्तिक देणगीदारांनी संस्थेच्या कामाला हातभार लावला. करोना साथीची तिसरी लाट आलीच तर तिला तोंड देण्याची सज्जता ‘फोरम’ने ठेवली आहे. प्राणवायू ‘कॉन्सटे्रटर’ देण्यासह आदिवासी भागात लसीकरण मोहीम राबवण्याचे नियोजनही तयार आहे.

हे वाचले का?  गणेशोत्सवात नाशिकमध्ये मध्यवर्ती रस्त्यांवर वाहतुकीचे निर्बंध – दुपारी तीन ते रात्री १२ वेळेत प्रवेश बंद

नऊ हजार कुटुंबांना शिधावाटप 

‘सोशल नेटवर्किंग फोरम’ दशकभरापासून ग्रामीण, आदिवासी भागातील पाणी, आरोग्य, शिक्षण क्षेत्रात काम करीत आहे. संस्थेच्या जलाभियानांतर्गत आजवर २५ गावे टँकरमुक्त झाली आहेत. करोनाने आदिवासी भागात नवे प्रश्न निर्माण केले. हे लक्षात घेऊन फोरमने कामाची दिशा बदलली. गेल्या वर्षी टाळेबंदी जाहीर झाली आणि हजारो आदिवासींचा रोजगार एका झटक्यात हिरावला गेला. या काळात फोरमने एका कुटुंबास महिनाभर पुरेल एवढा शिधा दिला. पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, कळवण, दिंडोरी आणि नाशिक ग्रामीणमधील नऊ हजार कुटुंबांना शिधावाटप करण्यात आले.

हे वाचले का?  आदिवासी विद्यार्थ्यांना आता बोलीभाषेत शिक्षण, चौथीपर्यंतच्या क्रमिक पुस्तकांचे १२ स्थानिक भाषांमध्ये रूपांतर

शिक्षण सुटू नये म्हणून…

ग्रामीण-आदिवासी भागांतील विद्यार्थ्यांचे शिक्षण करोना संकटातही सुरू राहावे यासाठी गेल्या वर्षी जुलै, ऑगस्टमध्ये सुमारे १८ हजार विद्यार्थ्यांना वह््या, लेखण्या, पुस्तके आणि इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप संस्थेतर्फे करण्यात आले.

मजुरांची पाठवणी

टाळेबंदी जाहीर झाली आणि अनेकांचा रोजगार गेला. त्यात परप्रांतीय मजूर होते. त्यांना आपल्या घरी परतायचे होते. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी एसटी महामंडळाशी समन्वय साधून हजारो परप्रांतीयांना महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत पोहचविण्यासाठी मदत केली. याच सुमारास कामासाठी गेलेले जव्हार, मोखाडा भागातील १२५ कामगार पश्चिम बंगालमध्ये अडकले होते. खासगी आराम बसची व्यवस्था करून संस्थेने त्यांना महाराष्ट्रात आणले.

लसीकरणाबाबत डांगी भाषेत जनजागृती

आदिवासी भागात लशीबाबत गैरसमज आहेत. त्यामुळे लस घेण्यास कुणी तयार नव्हते. आरोग्य सेवक, डॉक्टर गावात आले की, आदिवासी डोंगर-दऱ्यांमध्ये पळून जात. फोरमने गावोगावी-पाडोपाडी जनजागृती मोहीम राबवली. मूळचे सुरगाण्याचे डॉ. उद्धव चौधरी यांचे करोना ‘लस समज गैरसमज’ या विषयावर डांगी भाषेत ऑनलाइन व्याख्यान आयोजित केले. फोरमचे गावागावांत ‘ग्राम समन्वयक’ आहेत. लशीबाबतचे गैरसमज दूर करण्यास त्याचा उपयोग झाला, असे फोरमचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी सांगितले. पुरेशा लसमात्रा उपलब्ध झाल्यावर आदिवासी भागात लसीकरण मोहीम राबविण्याची तयारी संस्थेने केली आहे.

हे वाचले का?  तेल, डाळ, पिठाच्या दरवाढीने बहिणींना दिवाळी महाग, जितेंद्र आव्हाड यांची महायुतीवर टीका

मराठा बटालियनचा  मदतकार्यास हातभार

काश्मीरमध्ये तैनात मराठा बटालियन तेथील करोना उपचार केंद्रांना मदत करण्याचे आणि मोफत अन्नधान्य वितरणाचे काम करीत आहे. कर्नल प्रणय पवार यांनी काही मदत मिळेल काय, अशी विचारणा फोरमकडे केली आणि वस्तूंची यादीही पाठवली. करोना मदत कार्यासाठी संस्थेकडे योगेश कासट, राजेश बक्षी, माधव पाटणकर, चंद्रशेखर महाले, शिरीष इंगवले, विजय दुबे या अनिवासी भारतीयांच्या देणग्या आल्या होत्या. त्यातून काश्मीरमधील केंद्रांसाठी ६० वैद्यकीय उपकरणे देण्यात आली. एक हजार किलो खाद्यतेलही देण्यात आले. काश्मीरहून पुण्यात आलेली मालमोटार शोधून हे साहित्य मराठा बटालियनकडे पोहोचविण्यात आले.