करोना संकटामुळे साहित्य संमेलनात विशेष दक्षता

संमेलनात खुच्र्यांमध्ये अंतर ठेवणे, निर्जंतुकीकरण करणे, येणाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करणे असे उपाय करण्यात येणार आहेत.

नाशिक : जिल्हा परिसरात करोनाचे संकट घोंघावत असल्याने पुढील महिन्यात शहरात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विशेष दक्षता घेण्याचा निर्णय रविवारी अखिल भारतीय साहित्य महामंडळ आणि स्वागत समिती यांच्या एकत्रित झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

संमेलनात खुच्र्यांमध्ये अंतर ठेवणे, निर्जंतुकीकरण करणे, येणाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करणे असे उपाय करण्यात येणार आहेत. बैठकीत घेतलेल्या निर्णयांविषयी स्वागत समिती अध्यक्ष तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी माहिती दिली. करोनाचा संसर्ग वाढत असला तरी गर्दी नियंत्रणात आणण्यापेक्षा संमेलन स्थळावर येणारी गर्दी सुरक्षित घरी कशी पोहोचणार यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. संमेलन यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी ३९ वेगवेगळ्या समित्या तयार करण्यात आल्या असून महापालिका, पोलीस, प्रशासन पातळीवर संमेलनविषयक प्रमुख अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. जाहिरात, स्मरणिके च्या माध्यमातून निधी संकलित करण्यात येत आहे. सर्व स्तरांवर बैठका सुरू असून मदतीविषयी आवाहन करण्यात आले आहे. ग्रंथ संमेलनात ४०० कक्ष उभारण्यात येणार असून विविध परिसंवादासाठी उपमंडप उभारण्यात येणार आहेत.

हे वाचले का?  दिवाळीत भेसळ रोखण्यासाठी, अन्न औषध प्रशासन विभाग सज्ज

संमेलनास एक महिन्याचा अवकाश असून त्यानुसार करोना संसर्गाची स्थिती पाहून आवश्यक बदल करण्यात येतील. संमेलनासाठी रुग्णवाहिका, खासगी रुग्णालयात काही खाटा आरक्षित करण्यात येणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी कार्यक्रमाची रूपरेषा ठरली असून त्यानुसार काम सुरू असल्याचे सांगितले. करोनाचे संकट असतानाही कमी कालावधीत हे संमेलन आकारास येत आहे. नाशिककर जोखीम पत्करत असून जबाबदाऱ्यांचे वाटप करत जलद गतीने कामे करावीत, अशी सूचना त्यांनी के ली. संमेलनात शेतकरी आंदोलन आणि करोना संसर्ग या विषयावर चर्चा होणार आहे. उद््घाटकांची नावे ठरली असून लवकरच जाहीर होतील, असे ठाले पाटील यांनी सांगितले.

हे वाचले का?  नाशिक: मैत्रीपूर्ण लढतीची अजित पवारांना धास्ती, स्वकीय इच्छुकांचे प्रस्ताव धु़डकावले

सोडत पद्धतीने जागा… : पुस्तक प्रदर्शनात कक्षासाठी सोडत पद्धतीने जागा दिल्या जाणार आहेत. यासाठी जीएसटीचा विचार करता नोंदणी शुल्क कमी करण्यात आले. स्थानिक प्रकाशकांचा या शुल्काला विरोध असून संमेलनात बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. याविषयी बोलताना ठाले पाटील यांनी अशी तक्रार आपल्यापर्यंत आली नसल्याचे सांगितले. पालकमंत्री भुजबळ यांनी कक्ष उभारण्यासाठी येणारे शुल्क पाहता यात फायदा कोणाचा नसला तरी तोटा होणार नाही याची काळजी घेण्यात येत असून नाशिककरांना हा चिवटपणा शोभत नाही, असे नमूद के ले.

हे वाचले का?  नाशिक : सप्तश्रृंग गडासाठी जादा बससेवा