करोना संसर्गदर कमी न होणे चिंताजनक

जिल्ह्य़ात करोना रुग्णांच्या उपचारात निधीची कमतरता भासू नये यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यावर भर देण्यात येत आहे.

पायाभूत सुविधा उभारण्यावर भर देणार  -उपमुख्यमंत्री अजित पवार

नाशिक : जिल्ह्य़ात करोना रुग्णांच्या उपचारात निधीची कमतरता भासू नये यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यावर भर देण्यात येत आहे. प्राणवायू प्रकल्प सुरू करण्यात येत आहेत. जिल्हा नियोजन समिती, आमदार निधी, १५ वा वित्त आयोगाचा निधी यांचा यासाठी वापर करण्यात येत आहे. जिल्ह्य़ात सध्या करोना रुग्णांची संख्या कमी होत असून संसर्ग दर २.४० आहे. हा दर वाढत नसला तरी तो कमीही होत नाही, याबद्दल उपमुख्यमंत्री अजित  पवार यांनी चिंता व्यक्त केली.

हे वाचले का?  देवळालीत सरावावेळी तोफगोळ्याचा स्फोट, दोन अग्निविरांचा मृत्यू

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीनंतर उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जिल्ह्य़ात करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी प्रशासनाने लसीकरण मोठय़ा प्रमाणावर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्य़ात लसीकरण केंद्राची संख्या पाहिल्यास दिवसाकाठी ४० हजार लोकांचे लसीकरण होत आहे. मोठय़ा शहरांमध्ये हे प्रमाण एक लाखांच्या आत असल्याचे पवार यांनी सांगितले. सध्या लसींचा तुटवडा जाणवत असला तरी अन्य कं पन्याही यात उतरल्या आहेत. मधल्या काळात नाशिकमध्ये करोना रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढली. या काळात येथील रुग्णांचे नमुने धुळे येथे तपासणीसाठी पाठविले जात होते. नंतर नाशिकमध्येच नमुने तपासणीची व्यवस्था करण्यात आली. करोनामुळे स्मार्ट सिटी योजनेची कामे रखडली असावी.

हे वाचले का?  देवळालीत तोफगोळ्याचा स्फोट, लष्कराकडून चौकशीचे आदेश

केंद्राकडेही निधीची चणचण असू शकते, अशी शक्यता पवार यांनी वर्तविली. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, विधान परिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आ. सरोज अहिरे आदी उपस्थित होते.

संभाजी बिग्रेडचे कार्यकर्ते ताब्यात

उपमुख्यमंत्री अजित पवार गुरूवारी नाशिक दौऱ्यावर असतांना मराठा आरक्षणावर त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी संभाजी बिग्रेडचे कार्यकर्ते भेटणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.  पवार यांच्या ताफ्यालाअशोक स्तंभ परिसरात अडवत काळे झेंडे दाखविण्याचे नियोजन कार्यकर्त्यांनी के ले होते. परंतु, पोलिसांनी ताफा येण्यापूर्वीच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी आंदोलक, कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणावरून जोरदार घोषणाबाजी के ली.