कॅनडातील खलिस्तान समर्थकांसाठी भारतातून हवालामार्फत गेला पैसा! NIA च्या चार्जशीटमध्ये मोठा खुलासा!

२०१९ ते २०२१ या तीन वर्षांत भारतातून हवालामार्गे तब्बल १३ वेळा मोठ्या रकमा कॅनडात पाठवल्या गेल्या!

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर हरदीप सिंग निज्जरच्या हत्या प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप केल्यापासून दोन्ही देशांमधले संबंध ताणले गेले आहेत. खलिस्तान समर्थक हरदीप सिंग निज्जरची १८ जूनला व्हँकोव्हरमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ट्रुडो यांचे आरोप भारतानं फेटाळले आहेत. या वादाच्या पार्श्वभूमीवर कॅनडातील खलिस्तान समर्थकांकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. खलिस्तानी चळवळीची भारतातील पाळंमुळं खणून काढण्याचं काम NIA नं हाती घेतलं असून यासंदर्भात दाखल केलेल्या चार्जशीटमधून मोठे खुलासे करण्यात आले आहेत.

जस्टिन ट्रुडो यांच्या आरोपांनंतर भारतानं कॅनडातील खलिस्तान समर्थकांच्या कारवाया व कॅनडा सरकारकडून त्यांना मिळत असणारा आश्रय यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर खलिस्तान समर्थक व भारतातील वाँटेड गुन्हेगार गुरपतवंत सिंग पन्नू यानं कॅनडातील भारतीयांना पुन्हा भारतात निघून जाण्याची धमकी दिली आहे. त्यापाठोपाठ एनआयएनं पन्नूच्या चंदीगडमधील घरावर छापा टाकून ते जप्त केलं. आता एनआयएनं दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये भारतातून कॅनडातील खलिस्तान समर्थकांना हवालामार्फत पैसा पाठवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

हे वाचले का?  मोदी, बायडेन द्विपक्षीय चर्चा; हिंदप्रशांत सागरी प्रदेशासह जागतिक आणि प्रादेशिक मुद्दे उपस्थित

२०१९ ते २०२१ या काळात १३ वेळा पैशांचा व्यवहार

इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, एनआयएच्या चार्जशीटमध्ये भारतातून हा पैसा कधी आणि किती वेळा गेला, याविषयी उल्लेख करण्यात आला आहे. २०१९ ते २०२१ या तीन वर्षांच्या काळात भारतातून तब्बल १३ वेळा कॅनडा आणि थायलंडमध्ये हवालामार्फत पैसा पाठवण्यात आल्याचं यात नमूद करण्यात आलं आहे. यामध्ये ५ लाखांपासून ६० लाखांपर्यंतच्या रकमांचा समावेश आहे.

लॉरेन्स बिष्णोईमार्फत पैशांचं व्यवस्थापन

हे वाचले का?  Russia Attack On Ukraine : रशियाचा युक्रेनवर पुन्हा क्षेपणास्र हल्ला, पोल्टावामधील लष्करी शिक्षण संस्थेला केलं लक्ष्य; ५० जणांचा मृत्यू, २७१ जखमी

दरम्यान, हा पैसा लॉरेन्स बिष्णोईच्या मार्फत कॅनडातील खलिस्तान समर्थकांपर्यंत पोहोचवला जात असल्याचंही यात नमूद करण्यात आलं आहे. बब्बर खालसा इंटरनॅशनलसारख्या खलिस्तानी गटाचा म्होरक्या लखबीर सिंग लांडा याच्या मदतीने बिष्णोईनं हा सगळा पैसा फिरवल्याचंही या चार्जशीटमध्ये म्हटलं आहे. खंडणी, बेकायदेशीर मद्यविक्री, शस्त्रास्त्रांची तस्करी यामार्फत जमा केलेला पैसा लॉरेन्स बिष्णोईचा साथीदार गोल्डी ब्रार व सतबीर सिंग उर्फ सॅम या दोघांकडे आधी हस्तांतरीत व्हायचा. तिथून हो कॅनडातील इतर संघटनांना दिला जायचा.

यॉट, चित्रपट आणि कॅनडा प्रीमियम लीग!

हवालामार्फत कॅनडामध्ये पोहोचलेला पैसा खलिस्तानी चळवळीच्या म्होरक्यांमार्फत यॉट खरेदीसाठी, चित्रपट निर्मितीमध्ये व कॅनडा प्रीमियम लीगसारख्या स्पर्धांमध्ये गुंतवल्याचा दावा एनआयएच्या चार्जशीटमध्ये करण्यात आला आहे.

पैशांच्या हस्तांतरणाचे तपशील

दरम्यान, एनआयएनं चार्जशीटमध्ये नमूद केल्याप्रमाणे २०२१ वर्षात गोल्डी ब्रारला दर महिन्याला २ लाख रुपये पाठवण्यात आले. २०२०मध्ये गोल्डी ब्रारलाच दोन वेळा प्रत्येकी २० लाख रुपये पाठवण्यात आले. २०२०मध्ये सॅमला ५० लाख रुपये पाठवले गेले. २०२१मध्ये गोल्डी ब्रार व सॅमला ६० लाख रुपये पाठवण्यात आले. २०२१मध्ये सॅमला आणखी दोन वेळा ४० लाख व २० लाख रुपये पाठवण्यात आले.

हे वाचले का?  Harini Amarasuriya : हरिनी अमरसूर्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान; भारताशी आहे खास कनेक्शन