प्रणिती शिंदे यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना त्यांनी नीटच्या मुद्यावरून मोदी सरकावर टीका केली.
नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून काँग्रेसकडून केंद्र सरकारला सातत्याने लक्ष्य करण्यात येत आहे. सरकारने नीटच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा करावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. सोमवारी याच मुद्द्यावरून लोकसभेत गदारोळ झाल्याचंदेखील बघायला मिळालं. राहुल गांधी यांनी नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं. दरम्यान, आता काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनीही नीटच्या मुद्यावरून मोदी सरकावर टीका केली आहे.
प्रणिती शिंदे यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यादरम्यान, त्यांना नीट परीक्षेच्या मुद्द्यावर प्रश्न विचारला असता, मोदी सरकार नीटवर चर्चा करायला तयारी नाही. हे सरकार निगरगट्ट आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
नेमकं काय म्हणाल्या प्रणिती शिंदे?
काल लोकसभेत नीटवर जी काही थोडीफार चर्चा झाली, त्यादरम्यान, शिक्षणमंत्री नीटचा पेपर लीक झाला हे मानायला तयारच नव्हते. आम्ही नीटच्या मुद्द्यावरून सविस्तर चर्चा करण्याची मागणी केली. मात्र, सरकार यावर चर्चा करायलादेखील तयार नाही, नियम १९३ अंतर्गत जी चर्चा झाली, ती सुद्धा ऑलिम्पिकवर घेण्यात आली. या नियमानुसार प्रत्येक सत्रात एकदाच चर्चा होऊ शकते. त्यामुळे नियम १९३ अंतर्गत नीटवर चर्चा व्हावी, असा आमचा प्रयत्न होता. पण त्यांनी विरोधकांना काहीही न सांगता ऑलिम्पिकवर चर्चा ठेवली. आम्ही नीटच्या मुद्द्यावरून शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागितला, पण ते नीटचा पेपर लीक झाला, हे मान्य करायलाच तयार नाहीत, यावरून हे सरकार किती निगरगट्ट हे लक्षात येईल, अशी टीका प्रणिती शिंदे यांनी केली.
नीटच्या मुद्द्यावरून राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका
दरम्यान, सोमवारी नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून लोकसभेत चांगलाच गदारोळ झाल्याचं बघायला मिळालं. यावेळी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारला चांगलेच धारेवर धरलं. ‘देशात परीक्षांबाबत जे घडत आहे, त्यामुळे लाखो विद्यार्थी चिंतित आहेत. या विद्यार्थ्यांचा भारतीय परीक्षा प्रणालीवरचा विश्वास उडाला आहे. यादेशात जर तुम्ही श्रीमंत असाल आणि तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही भारतीय परीक्षा पास होऊ शकता, तुम्ही पैशाने कागद खरेदी करू शकता हे लोकांना माहीत आहे आणि विरोधकांचीही तीच भावना आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
देशातील परीक्षा पद्धतीत खूप गंभीर समस्या आहेत, हे स्पष्ट झाले आहे. केवळ नीट परीक्षाच नाही, तर देशातील सर्वच प्रमुख परीक्षांमध्ये घोटाळे बघायला मिळत आहेत. सरकारला याची उत्तरं द्यावी लागतील, असेही ते म्हणाले.
धर्मेंद्र प्रधान यांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर
राहुल गांधी यांच्या या टीकेला शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही प्रत्युत्तर दिलं. ‘मला कोणाकडूनही माझ्या शिक्षणाचे प्रमाणपत्र नको आहे. माझ्या जनतेने मला निवडून पाठवले आहे. माझ्या पंतप्रधानांनी मला जबाबदारी दिली आहे. देशाची परीक्षा प्रणाली रद्दबातल आहे, असे म्हणणे. यापेक्षा दुर्दैवी काहीही असू शकत नाही, असं ते म्हणाले.
First published on: