कोकण रेल्वे मार्गावर ‘वंदे भारत एक्सप्रेस’ ५ जूनपासून धावणार

कोकण रेल्वे मार्गावरील बहुचर्चित मडगाव-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस येत्या ५ जूनपासून धावणार आहे.

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावरील बहुचर्चित मडगाव-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस येत्या ५ जूनपासून धावणार आहे. मडगाव रेल्वे स्थानकावर येत्या ३ जून रोजी सकाळी साडेदहा वाजता या गाडीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णवी मडगाव स्थानकावर उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर ५ जूनपासून ही गाडी प्रवाशांच्या नियमित सेवेसाठी दाखल होणार आहे.

ही गाडी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सकाळी ५ वाजून २५ मिनिटांनी सुटणार असून दादर (५.३२), ठाणे (५.५२), पनवेल (६.३०), रोहा (७.३०), खेड (८.२४), रत्नागिरी (९.४५), कणकवली (११.२०) थिवीम (१२.२८) या स्थानकांवर थांबून मडगावला दुपारी १.१५ वाजता पोहोचणार आहे .

हे वाचले का?  Maharashtra Election 2024 : यवतमाळमध्ये महायुती वर्चस्व कायम राखणार का ?

परतीच्या प्रवासात ही गाडी मडगाव येथून दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी सुटणार असून थिवीम (३.२०), कणकवली (४.१८), रत्नागिरी (५.४५), खेड (७.०८), रोहा(८.२०), पनवेल (९), ठाणे (९.३५), दादर(१०.०५) हे थांबे घेऊन मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसला रात्री १० वाजून २५ मिनिटांनी पोहोचेणार आहे.

मार्गावरील रायगड जिल्ह्यात पनवेल व रोहा, रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी व खेड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात फक्त कणकवली या स्थानकांवर ही गाडी थांबणार आहे. यापैकी रत्नागिरी स्थानकावर ही गाडी ५ मिनिटे थांबणार आहे. मात्र अन्य सर्व स्थानकांवर ती फक्त दोन मिनिटे थांबेल. तसेच हे वेळापत्रक मान्सूनचा काळ वगळता वर्षांच्या उरलेल्या काळासाठी आहे, असेही रेल्वे खात्याने स्पष्ट केले आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या इतर गाडय़ांचा वेग मान्सूनच्या काळात कमी असतो. त्यामुळे या चार महिन्यांसाठी त्या गाडय़ांचे वेगळे वेळापत्रक असते. त्याच धर्तीवर याही गाडीचे हे वेळापत्रक पुढील महिन्यापासून बदलणार का, हे अजून स्पष्ट झालेले नाही.

हे वाचले का?  Mangesh Sasane : “मराठ्यांची नोंद ‘क्षत्रिय’ तर कुणबींची नोंद ‘क्षुद्र’ म्हणून, गॅझेट वाचा, अज्ञानी मागण्या…”, मंगेश ससाणेंचा मनोज जरांगेंना सल्ला