कोयना प्रकल्पाचे प्रश्न मार्गी लावण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

कोयना जलविद्युत प्रकल्प व या भागातील पर्यटनाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली

कोयना जलविद्युत प्रकल्प व या भागातील पर्यटनाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. त्यांनी, पर्यटन विकासाचा आराखडा तयार करा, तो मंजूर करण्याबरोबरच कोयना प्रकल्पासंदर्भातील प्रश्नही मार्गी लावू, अशी ग्वाही दिली असल्याचे राज्याचे सहकार व पणनमंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज गुरुवारी सकाळी कोयना जलविद्युत प्रकल्प व प्रकल्पाच्या टप्पा क्रमांक चारची पाहणी करून पुणे येथील एक्सप्रेस हायवेच्या टनेलच्या पाहणीसाठी ते रवाना झाले. त्यानंतर कोयनानगर (ता. पाटण) येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत मंत्री पाटील यांनी ठाकरे यांच्या पाहणी दौऱ्याची सविस्तर माहिती दिली. राज्याचे वित्त व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार महेश शिंदे यांची उपस्थिती होती.

हे वाचले का?  सांगलीत महापालिका शाळेत तब्बल ४० विद्यार्थ्यांना मारहाण, शिक्षिका निलंबित

बाळासाहेब पाटील म्हणाले, की महाविकास आघाडी सत्तेत येताच रखडलेल्या प्रकल्पांची पाहणी करून ते मार्गी लावण्याचा निर्णय मंत्रिमंडळात झाला होता. पण, करोनाच्या पार्श्वभूमीवरील टाळेबंदीमुळे आम्हाला राज्यातील प्रकल्पांना भेटी देता आल्या नाहीत. मात्र, आता प्रकल्पांना भेटी देत तेथील अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून आज मुख्यमंत्र्यांनी येथे पाहणी करून एकंदर आढावा घेतला आहे.

हे वाचले का?  RBI Repo Rate: व्याजदराबाबत रिझर्व्ह बँकेचं ‘आस्ते कदम’ चालूच; सलग दहाव्यांदा कोणतेही बदल नाहीत!

शंभूराज देसाई म्हणाले, की कोयना जलविद्युत प्रकल्पाची यंत्रसामुग्री ही १९६४ सालातील असल्याने आता त्यात आमूलाग्र बदल करून सध्याच्या २ हजार मेगाव्ॉट वीज निर्मितीची क्षमता आणखी वाढवता येते का, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली आहे. त्याचबरोबर या प्रकल्पासंदर्भातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासंदर्भात कार्यवाहीच्याही सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. कोयना पर्यटनासंदर्भातही मुख्यमंत्री सकारात्मक असून, त्यांनी त्याबाबतही उचित सूचना केल्या असल्याचे मंत्री देसाई यांनी सांगितले.