क्रीडाक्षेत्रातील यश देशाच्या प्रगतीचे सूचक! बुद्धिबळपटूंशी भेटीदरम्यान पंतप्रधानांची विविध विषयांवर चर्चा

पंतप्रधानांनी भारताच्या या सुवर्णवीरांची बुधवारी भेट घेतली. पंतप्रधान आणि खेळाडूंतील संवादाची चित्रफीत गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली.
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
केवळ अर्थव्यवस्था नाही, तर क्रीडाक्षेत्रातील यशही देशाच्या प्रगतीचे आणि विकासाचे सूचक असते. खेळाडू विविध स्पर्धांत सुवर्णपदकांची कमाई करतात, तेव्हा आपला देश अधिक महान होतो, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑलिम्पियाड विजेत्या भारताच्या पुरुष आणि महिला संघांशी भेटीदरम्यान मांडले.

पंतप्रधानांनी भारताच्या या सुवर्णवीरांची बुधवारी भेट घेतली. पंतप्रधान आणि खेळाडूंतील संवादाची चित्रफीत गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली. यावेळी ऐतिहासिक कामगिरीसाठी खेळाडूंचे कौतुक करतानाच कृत्रिम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) बुद्धिबळावरील प्रभाव आणि अन्य काही विषयांवर त्यांनी चर्चा केली. मोदी यांनी खेळाडूंना ऑलिम्पियाड स्पर्धा आणि भारताच्या यशस्वी कामगिरीनंतर प्रतिस्पर्ध्यांची प्रतिक्रिया, याबाबत प्रश्नही विचारले.

हे वाचले का?  ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या जन्मगावी क्रीडा संकुलासाठी अखेर २५.७५ कोटींचा निधी मंजूर

‘‘आम्ही इतक्या मोठ्या फरकाने ही स्पर्धा जिंकली की प्रतिस्पर्ध्यांनाही आमचे कौतुक करावे लागले,’’ असे महिला संघाची सदस्य तानिया सचदेवने सांगितले. तसेच तानियाने मोदी यांना त्यांची खेळातील आवड याबाबत प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना मोदी म्हणाले, ‘‘केवळ अर्थव्यवस्था नाही, तर क्रीडाक्षेत्रातील यशही देशाच्या प्रगतीचे आणि विकासाचे सूचक असते. देश म्हणून तुम्ही किती विकसित आहात, हे दर्शविण्यासाठी प्रत्येक क्षेत्रातील यश महत्त्वाचे असते. चित्रपटांबाबत बोलायचे तर तुम्ही किती ऑस्कर पुरस्कार जिंकलात, विज्ञानात तुम्ही किती नोबेल पुरस्कार जिंकलेत, या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. त्याच प्रमाणे क्रीडाक्षेत्रात आपली मुले जेव्हा विविध स्पर्धांमध्ये अधिकाधिक सुवर्णपदके जिंकतात, तेव्हा देश महान होण्यास मदत होते.’’

हे वाचले का?  Air India : एअर इंडियाने प्रवाशांसाठी आता आणली ‘ही’ नवी सुविधा; कसा घेता येणार लाभ?

तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा बुद्धिबळावर कितपत परिणाम झाला हे जाणून घेण्यास मोदी उत्सुक होते. ‘‘कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने बुद्धिबळ अधिक विकसित झाले आहे. संगणक अधिक मजबूत झाले आहेत आणि ते आणखी कल्पकता दर्शवीत आहेत,’’ असे प्रज्ञानंदने सांगितले.

या भेटीसाठी ऑलिम्पियाड विजेत्या पुरुष संघातील डी. गुकेश, प्रज्ञानंद, अर्जुन एरिगेसी आणि विदित गुजराथी, तर महिला संघात द्रोणावल्ली हरिका, आर. वैशाली, नागपूरची दिव्या देशमुख, वंतिका अग्रवाल आणि तानिया सचदेव या खेळाडू उपस्थित होत्या.

हे वाचले का?  Vinesh Phogat : “ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर भारत सरकारने सहकार्य केलं नाही”, विनेश फोगटचा गंभीर आरोप