खडक फोडण्यासाठी केलेल्या स्फोटांमुळे घरांना तडे

खडक फोडण्यासाठी केलेल्या स्फोटांमुळे घरांना तडे

समृद्धी महामार्गाचे काम

इगतपुरी : तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून काही ठिकाणी रस्ता बनविताना खडक बाजूला करण्यासाठी स्फोट के ले जात आहेत. मोठय़ा प्रमाणात करण्यात येणाऱ्या या स्फोटांमुळे तालुक्यातील धामणी गावातील घरांना तडे गेले आहेत. या स्फोटांमुळे दगड वर उडून घरांवर पडत असल्याने कौले आणि पत्रे फुटत आहेत. तसेच शेतातील शेतमालावरही दगड आणि माती पडत असल्याने शेतमालाचे नुकसान होत  आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

मंजुरीपासून तर काम सुरू होईपर्यंत चर्चेत राहिलेल्या समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूर हे अंतर काही तासांनी कमी होणार आहे. या महामार्गालगतच्या गावांचा आणि शहरांचाही विकास होण्यास त्यामुळे मदत होणार असल्याचे सांगितले जाते. समृद्धी महामार्गात जमीन गेल्यामुळे आधीच शेतकरी भूमिहीन झाला आहे. जमिनीच्या मोबदल्यात मिळालेल्या पैशातून येथील शेतकऱ्यांनी नवीन घरे बांधली आहेत. आता या महामार्गाच्या कामामुळे राजाराम भोसले, संदीप भोसले, पंढरीनाथ भोसले, रामचंद्र भोसले, परशुराम भोसले, किरण काळे, गणेश काळे, शिवाजी भोसले, केशव भोसले आदींच्या नवीन घरांना तडे गेल्याने घरांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.  तसेच विठोबा भोसले, राजाराम भोसले, पांडुरंग भोसले, रमेश भोसले आदी शेतकऱ्यांच्या शेतातील टोमॅटो, काकडी या पिकांवर दगड आणि माती पडल्याने शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. घरांच्या नुकसानीची आणि पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळावी, या मागणीसाठी धामणीचे सरपंच गोतम भोसले यांनी तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना माहिती दिली आहे. तहसीलदार कासुळे, सहायक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांनी धामणी येथे भेट देऊन स्फोटांमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. विशेष म्हणजे स्फोटांसाठी वापरण्यात येणारा जिलेटिनचा साठा बेवारस पडलेला आहे. एखादा समाजकं टक त्यांचा विघातक कृत्यासाठी उपयोग करण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिलेटिन साठय़ाजवळ सुरक्षारक्षक नसल्याने त्यांच्याविषयी माहिती नसणाऱ्या व्यक्तींकडून नकळत ही स्फोटके  हाताळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता येथील नागरिक व्यक्त करीत आहेत.

हे वाचले का?  नाशिक: मुक्त विद्यापीठाकडून ३० दिवसांच्या आत निकाल जाहीर