गणेशोत्सवात नाशिकमध्ये मध्यवर्ती रस्त्यांवर वाहतुकीचे निर्बंध – दुपारी तीन ते रात्री १२ वेळेत प्रवेश बंद

सार्वजनिक गणेशोत्सवात आरास, सजावट पाहण्यासाठी भक्तांची होणारी गर्दी लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी मध्यवर्ती भागातील एकूण ११ मार्गांवर दुपारी तीन ते रात्री १२ या वेळेत वाहतुकीचे निर्बंध लागू केले आहेत.

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक – सार्वजनिक गणेशोत्सवात आरास, सजावट पाहण्यासाठी भक्तांची होणारी गर्दी लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी मध्यवर्ती भागातील एकूण ११ मार्गांवर दुपारी तीन ते रात्री १२ या वेळेत वाहतुकीचे निर्बंध लागू केले आहेत. या काळात संंबंधित मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

गणेशोत्सवात भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस उपायुक्त (वाहतूक) चंद्रकांत खांडवी यांनी या संदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. बी. डी. भालेकर मैदानावर अनेक सार्वजनिक मंडळांच्या गणपतींची स्थापना झालेली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे ११ ते १६ सप्टेंबर या कालावधीत परिसरातील वाहतुकीवर निर्बंध राहतील. यामध्ये किटकॅट चौफुलीकडून कालिदास कलामंदिरमार्गे शालिमार चौकाकडे जाणारा रस्ता, सीबीएसकडून कान्हेरेवाडीमार्गे किटकॅट चौफुली व शालिमारकडे जाणारा मार्ग, सारडा सर्कल-खडकाळी- सिग्नल-शालिमारमार्गे सीबीएसकडे ये-जा करणारा मार्ग, त्र्यंबक पोलीस चौकी-बादशाही कॉर्नर-गाडगे महाराज पुतळा-धुमाळ पॉइंट ते मंगेश मिठाई कॉर्नर, सीबीएस सिग्नल ते शालिमार, मेहेर सिग्नल-सांगली बँक सिग्नल-धुमाळ पॉइंटमार्गे दहीपूलाकडे जाणारा मार्ग, प्रतिक लॉज ते नेपाळी कॉर्नर, अशोक स्तंभ-रविवार कारंजा-मालेगाव स्टँड मार्ग, रविवार कारंजा-सांगली बँक सिग्नलमार्गे शालिमारकडे जाणारा रस्ता यांचा समावेश आहे. या मार्गांवर दुपारनंतर वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे.

हे वाचले का?  नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या सुंदरतेसाठी स्थानिक वास्तूविशारदांचे सहाय्य

बससेवेलाही निर्बंध

पाचव्या आणि सातव्या दिवशीही घरगुती व सार्वजनिक मंडळांतर्फे गणपती विसर्जन केले जाते. या दिवशी विसर्जन मिरवणूक काढली जाते. गणपती आरास पाहण्यासाठी गर्दी होत आहे. यामुळे पंचवटी कारंजा, मालेगाव स्टँड, रविवार कारंजा, अशोक स्तंभ, या मार्गावर गर्दी होऊन वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निमाणी स्थानकातून पंचवटी कारंजा-रविवार कारंजा या मार्गावरून जाणाऱ्या राज्य परिवहन व सिटीलिंक बस आणि अवजड वाहनांना ११ ते १३ सप्टेंबर या काळात दुपारी दोन ते रात्री १२ या वेळेत प्रवेश बंद राहणार आहे. तसेच सीबीएसकडून रविवार कारंजामार्गे पंचवटीकडे जाणाऱ्या सर्व बस, अवजड वाहनांना उपरोक्त काळात प्रवेश बंद राहील. या काळात निमाणी बस स्थानक भागातून मार्गस्थ होणाऱ्या बस काट्या मारुती चौक-संतोष टी पॉइंट-कन्नमवार पूल-द्वारका चौकातून इतरत्र जातील. तर सीबीएसकडून पंचवटीकडे जाणाऱ्या बस व अवजड वाहने अशोक स्तंभ-रामवाडी पूल-मखमलाबाद नाका-पेठनाका सिग्नल-दिंडोरी नाकामार्गे निमाणी स्थानक या पर्यायी मार्गाचा अवलंब करतील.