गावठी कट्टय़ांच्या शोधासाठी महाराष्ट्र, मध्यप्रदेश सरकारची संयुक्त मोहीम

अवैध शस्त्रे बाळगण्याची तरुणांमध्ये आकर्षण निर्माण झाले आहे. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांमध्ये धाडस वाढते.

नगर : गावठी कट्टा बाळगण्याचे तरुणांमध्ये मोठे आकर्षण निर्माण झाले आहे. लगतच्या मध्यप्रदेश व उत्तर प्रदेशातून मोठय़ा प्रमाणावर गावठी कट्टे आणले जातात. मात्र महाराष्ट्रातील पोलिसांना तेथे जाऊन कारवाई करण्यात अडचणी जाणवतात. त्यामुळे अवैध गावठी कट्टे सीमा पार करून महाराष्ट्रात येण्यावर प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांनी ‘मास्टरप्लॅन’ तयार केला आहे. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन्ही राज्य सरकारच्या माध्यमातून त्याला प्रतिबंध करण्यात येईल. याबरोबरच नाशिक विभागात अवैद्य शस्त्रे बाळगण्याच्या विरोधात शिक्षक व पालकांमार्फत युवकांमध्ये जनजागृती घडवली जाणार आहे.नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी ही माहिती दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक दिपाली काळे व सौरभ अग्रवाल यावेळी उपस्थित होते. नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांत गेल्या महिनाभरात २७ गावठी कट्टे तसेच ७० तलवारी हस्तगत करण्यात आल्या. नगर जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसात ५ गावठी कट्टे जप्त करण्यात आले आहेत.

हे वाचले का?  Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live: कालीचरण यांची मनोज जरांगे पाटील यांच्यावर जहरी टीका: म्हणाले…

नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांत गावठी कट्टय़ांच्या विरोधात पोलिसांनी मोहीम हाती घेतल्याची माहिती देऊन पोलीस महानिरीक्षक शेखर यांनी सांगितले की, महाराष्ट्रात बहुतांशी करून मध्यप्रदेश व उत्तरप्रदेशातून गावठी कट्टे आणले जातात. अवैध शस्त्रे बाळगण्याची तरुणांमध्ये आकर्षण निर्माण झाले आहे. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांमध्ये धाडस वाढते.

गावठी कट्टे हस्तगत केले जातात, ते विकणारेही पकडले जातात. मात्र जेथे गावठी कट्टे तयार केले जातात, जेथून गावठी कट्टे आणले जातात त्या मुळापर्यंत पोलीस जात नाहीत, मध्यप्रदेशमधील कारवाईत पोलिसांना अडचणी जाणवतात, याकडे लक्ष वेधले असता शेखर म्हणाले की, यासंदर्भात आपण पोलीस महासंचालकांकडे विषय उपस्थित केला. पोलीस ‘मास्टरप्लॅन’ तयार करत आहेत. त्याची जबाबदारी जळगावच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांवर सोपवण्यात आली आहे. महाराष्ट्र व मध्यप्रदेश सरकार मिळून ही कारवाई करेल. गावठी कट्टे बाळगणारे तरुण इतर गुन्ह्यत आढळल्यास तसेच त्यांच्याविरुद्ध पूर्वीही गुन्हे दाखल असल्यास त्याचा शोध घेऊन प्रतिबंधक कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हे वाचले का?  Maharashtra News Live : “फोन आला अन् एक गाडी सोडली”; खेड-शिवापूर पाच कोटींची रक्कम जप्त प्रकरणी संजय राऊतांचा गंभीर आरोप

शिक्षक-पालकांमार्फत जनजागृती

तरुणांमध्ये अवैध शस्त्रे, गावठी कट्टे बाळगण्याची आकर्षण वाढते आहे. त्यामुळे गुन्हे करण्याचे धाडस वाढते. हे लक्षात घेऊन शिक्षक, पालकांमार्फत जनजागृती केली जाईल. प्रत्येक पोलीस उपअधीक्षकास आपल्या कार्यक्षेत्रात याबद्दल मोहीम राबविण्यास सांगितले आहे, असेही पोलीस महानिरीक्षक शेखर यांनी स्पष्ट केले.