गुजरातला बदनाम करून गुंतवणूक रोखण्यासाठी कटकारस्थाने ; पंतप्रधान मोदी यांचा दावा    

मोदींच्या हस्ते भूज येथे चार हजार चारशे कोटी गुंतवणुकीच्या विविध योजनांचे उद्घाटन व पायाभरणी करण्यात आली.

भूज (गुजरात) : ‘‘गुजरातला बदनाम करून या राज्यात येणाऱ्या गुंतवणुकीस रोखण्यासाठी कट-कारस्थाने रचली गेली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून गुजरातने प्रगतिपथावर वाटचाल केली,’’ असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे काढले. या वर्षांखेरीस गुजरात विधानसभा निवडणूक होणार आहेत. त्याआधी भूज येथील विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि त्यांची पायाभरणी केल्यानंतर झालेल्या जाहीर सभेत मोदी बोलत होते.

मोदींच्या हस्ते भूज येथे चार हजार चारशे कोटी गुंतवणुकीच्या विविध योजनांचे उद्घाटन व पायाभरणी करण्यात आली. यामध्ये सरदार सरोवर परियोजनेंतर्गत कच्छ भागासाठीचा कालवा, सरहद डेअरीच्या नव्या स्वयंचलित दूध प्रक्रिया आणि पॅकिंग यंत्रणा, भूज विज्ञान केंद्र, गांधीधाम येथे डॉ. आंबेडकर संमेलन केंद्र, अंजार येथील वीर बालक स्मारक आणि नखत्राणा येथे भूज २ उपस्थानकाचा समावेश आहे.

हे वाचले का?  अंतराळातील कचऱ्याबद्दल राष्ट्रपतींकडून चिंता व्यक्त

मोदी म्हणाले, की सध्या अनेक कमतरता-त्रुटी असतानाही त्यावर मात करत २०४७ पर्यंत भारत एक विकसित राष्ट्र होईल. जेव्हा गुजरात एकापाठोपाठ एक नैसर्गिक संकटांना तोंड देत होता, तेव्हा गुजरातला देश-विदेशांत बदनाम करण्याचा कट रचला गेला. गुजरात राज्यात गुंतवणुकीसाठी येणाऱ्या प्रकल्पांना रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले गेले. गुजरातला बदनाम करण्याच्या सर्व प्रयत्नांकडे दुर्लक्ष करून गुजरातने त्यावर मात केली व प्रगतिपथावरील नवनवीन टप्पे हे राज्य गाठत गेले.

२००१ मध्ये कच्छच्या विनाशकारी भूकंपानंतर मी गुजरातवासीयांसह कच्छच्या पुनर्विकासाचा संकल्प केला आणि त्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली. त्या आव्हानात्मक कठीण काळात, आम्ही आपत्तीचे संधीत रूपांतर करू, असे सांगितले होते व ते साध्य केले. आज आपण त्याचे फलित पाहत आहोत. कच्छ भूकंपातून सावरणार नाही, असे त्यावेळी म्हणणारे निराशावादी बरेच होते, परंतु येथील भूमिपुत्रांनी कायापालट केला.

हे वाचले का?  जम्मू विभागात दहशतवादी कारवायांत वाढ; वर्षभरात ४४ ठार

कच्छ भूकंपबळींचे स्मारक

२००१ च्या कच्छ भूकंपातील सुमारे तेरा हजार मृतांच्या स्मृत्यर्थ उभारलेल्या भुज येथील स्मृतिवन स्मारक आणि अंजार येथील वीर बाल स्मारक या दोन्ही स्मारकांचे मोदींनी उद्घाटन केले. हे कच्छ, गुजरात आणि संपूर्ण देशाने भोगलेल्या वेदनांचे प्रतीक असल्याचे सांगून मोदी यांनी कच्छच्या समृद्ध वारशाचाही आढावा घेतला. ते म्हणाले. की या स्मारकांचे उद्घाटन करताना माझ्या हृदयात अनेक भावना उचंबळून आल्या. मी नम्रपणे सांगू शकतो की मृतांच्या स्मरणार्थ उभारलेले हे स्मारक अमेरिकेतील ९/११ चे स्मारक आणि जपानमधील हिरोशिमा स्मारकासमानच आहे. कच्छला भूकंप झाला तेव्हा दुसऱ्याच दिवशी आपण इथे पोहोचलो होतो. मी तेव्हा गुजरातचा मुख्यमंत्री नव्हतो, एक सामान्य कार्यकर्ता होतो. मी किती भूकंपग्रस्तांना मदत करू शकेन, हे मला माहीत नव्हते. पण या दु:खाच्या प्रसंगी तुम्हा सर्वाच्या पाठीशी राहीन, असे मी ठरवले होते. जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा या सेवेच्या अनुभवाचा मला खूप फायदा झाला.

हे वाचले का?  “हिंदुंनो परत जा”, अमेरिकेत मंदिराची विटंबना; दहा दिवसांतील दुसरी घटना