गोदाकाठ फेरीवालामुक्तीच्या दिशेने; गुरुवारी राबविलेल्या धडक मोहिमेत शेकडो फेरीवाल्यांवर कारवाई

फेरीवाल्यामुळे गोदावरीची अवस्था बिकट होत असल्याचे लक्षात घेत महापालिकेने गुरुवारी राबविलेल्या धडक मोहिमेत नदी काठालगतचा परिसर आणि लहान-मोठय़ा पुलांवर ठाण मांडून बसलेल्या शेकडो फेरीवाल्यांवर कारवाई केली.

नाशिक : फेरीवाल्यामुळे गोदावरीची अवस्था बिकट होत असल्याचे लक्षात घेत महापालिकेने गुरुवारी राबविलेल्या धडक मोहिमेत नदी काठालगतचा परिसर आणि लहान-मोठय़ा पुलांवर ठाण मांडून बसलेल्या शेकडो फेरीवाल्यांवर कारवाई केली. फेरीवाल्यांच्या विळख्यात सापडलेला रविवार कारंजाकडून नदीपात्राकडे जाणारा मार्ग, बोहोरपट्टी, सराफ बाजार, रामसेतू, दहीपूल परिसरात कारवाईचा इशारा दिल्यामुळे अनेक फेरीवाले अंतर्धान पावले.

पालिका आयुक्त रमेश पवार यांनी अलीकडेच रिक्षातून गोदा काठाची पाहणी केली होती. तेव्हा दोन्ही काठासह आसपासचे रस्ते फेरीवाल्यांनी व्यापल्याचे दिसले होते. फेरीवाल्यांमुळे गोदावरीची अवस्था बिकट होत आहे. त्यामुळे पूजा साहित्याची दुकाने वगळता हा परिसर फेरीवालामुक्त करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. त्यानुसार गुरूवारी सकाळी अतिक्रमण निर्मूलन विभागाची पथके धडकली. उपायुक्त (अतिक्रमण) तथा अतिरिक्त आयुक्त करूणा डहाळे, उपायुक्त मेनकर आदींच्या मार्गदर्शनाखाली गोदा काठावर कारवाईला सुरूवात झाली. फेरीवाल्यांना पूर्वकल्पना दिली गेली होती. त्यामुळे काहींनी स्वत:हून अनधिकृत दुकाने काढून घेतली,  ज्यांनी काढली नाहीत, त्यांच्यावर पथकांनी कारवाई केली.

हे वाचले का?  नाशिक: मैत्रीपूर्ण लढतीची अजित पवारांना धास्ती, स्वकीय इच्छुकांचे प्रस्ताव धु़डकावले

संबंधितांचे साहित्य जप्त करण्यात आले. रामसेतू पुलावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण होते. तेही हटविले गेले. रविवार कारंजाकडून गोदावरीकडे जाणाऱ्या मार्गावर फेरीवाल्यांमुळे पायी चालणे मुश्कील झालेले असते. बोहोरपट्टी, सराफ बाजार, दहीपूल परिसरात कारवाईचा इशारा दिला गेल्याचे उपायुक्त करूणा डहाळे यांनी सांगितले. दुपापर्यंत ४०० ते ५०० फेरीवाल्यांवर कारवाई झाल्याचा अंदाज आहे. नदीच्या पलीकडील भागातही याच प्रकारे कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सूचित केले. दरम्यान, मनपा पथकाची चाहून लागल्याने बोहोरपट्टी, दहीपूल, सराफ बाजारातून फेरीवाल्यांनी काढता पाय घेतला.

हे वाचले का?  गणेशोत्सवात नाशिकमध्ये मध्यवर्ती रस्त्यांवर वाहतुकीचे निर्बंध – दुपारी तीन ते रात्री १२ वेळेत प्रवेश बंद

कारवाईत सातत्य राहणार का ?

पहिल्या दिवशी गोदा काठ परिसरात कारवाई झाली. सराफ बाजार, बोहोरपट्टी, दहीपूल भागात कारवाईचा इशारा दिल्यावर अनेक फेरीवाले गायब झाले. एरवी हा संपूर्ण परिसर शेकडो फेरीवाल्यांनी व्यापलेला असतो. तेथून पायी चालणे जिकीरीचे ठरते. यापूर्वी त्यांच्यावर अनेकदा कारवाई झाली आहे. मनपाची पथके मार्गस्थ झाली की फेरीवाले पुन्हा दाखल होतात. कारवाईत सातत्य राखण्याची गरज आहे. मेनरोड, शालिमार भागातही वेगळी स्थिती नाही. सर्व रस्त्यांवर छोटय़ा विक्रेत्यांनी अतिक्रमण केलेले आहे. फेरीवालामुक्त होणाऱ्या भागात पुन्हा पूर्वीची स्थिती निर्माण होणार नाही, याकरिता सातत्य राखण्याची गरज व्यक्त होत आहे.

हे वाचले का?  आदिवासी विद्यार्थ्यांना आता बोलीभाषेत शिक्षण, चौथीपर्यंतच्या क्रमिक पुस्तकांचे १२ स्थानिक भाषांमध्ये रूपांतर