गोदावरी पात्रात वाहन, कपडे धुतल्यास कारवाई

उपरोक्त आदेशाचा भंग करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचा इशारा पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी दिला.

नाशिक : शहरातून वाहणाऱ्या गोदावरीला प्रदूषणाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्या अंतर्गत गोदावरी पात्रात कपडे, भांडे, मोटार, वाहने धुण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. नदीपात्रात कचरा टाकणे, प्लास्टिकच्या पिशव्या टाकणे अथवा गोदावरी प्रदूषित होईल असे कृत्य करण्यास बंदी घालण्यात आली आहे. उपरोक्त आदेशाचा भंग करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचा इशारा पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी दिला.

हे वाचले का?  Jayakwadi Dam: जायकवाडीसाठी नाशिकमधून आतापर्यंत १७ टीएमसी पाणी, धरणांतील विसर्ग मंदावला

गोदावरी प्रदूषण मुक्तीसाठी परिमंडळ एकच्या कार्यक्षेत्रात फौजदारी प्रकिया संहितेतील कलमान्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केल्याचे शहर पोलीस उपायुक्त तांबे यांनी म्हटले आहे. गोदावरी नदी प्रदूषणमुक्त असावी यासाठी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार ‘हरितकुंभ’ संकल्पना तयार करण्यात आलेली आहे. पोलीस आयुक्तालय परिमंडळ एक कार्यक्षेत्रातील भद्रकाली, सरकारवाडा, पंचवटी, गंगापूर, आडगांव पोलीस ठाणे हद्दीत गोदावरी नदीचे पात्र आहे. या नदीपात्रात अथवा नदीकिनारी कपडे, भांडे, मोटार वाहन धुणे, जनावरे धुणे तसेच नदीपात्रात कचरा टाकणे, प्लास्टिकच्या पिशव्या टाकणे अथवा गोदावरी प्रदूषित होईल असे कृत्य करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचा भंग करणारी व्यक्ती शिक्षेस पात्र राहील, असे तांबे यांनी नमूद केले आहे.