‘चांद्रयान ३’च्या शिलेदारांना वर्षभर पगारच मिळाला नाही; तरी मोहिमेत उचलला मोलाचा वाटा!

चांद्रयान ३ साठी लाँचपॅड बनवणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षभराहून अधिक काळ पगारच मिळाला नसल्याचं सांगितलं जात आहे.

भारताच्या अवकाश संशोधन कार्यक्रमातलं मोठं पाऊल म्हणून चांद्रयान ३ मोहिमेकडे पाहिलं जातं. चांद्रयान २ च्या अपयशानंतर चांद्रयान ३ मोहिमेवर इस्रोच्या शास्त्रज्ञांसह सर्वच संबंधितांनी प्रचंड मेहनत घेतली. १४ जुलै रोजी चांद्रयान ३ चं श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रावरून प्रक्षेपण करण्यात आलं. २३ ऑगस्ट रोजी हे यान चंद्रावर उतरण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जगभरातून भारताच्या कामगिरीचं कौतुक केलं जात असताना या मोहिमेत मोलाची कामगिरी बजावणाऱ्या शिलेदारांना गेल्या वर्षभरापासून पगारच मिळाला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे!

हे वाचले का?  भारतात अनेक सिंगापूर निर्माण करण्याचा ध्यास; दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

‘द वायर’नं आयएएनएसच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तामध्ये यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. लाँच पॅडच्या सहाय्याने चांद्रयान ३ चं प्रक्षेपण करण्यात आलं. तेच लाँचपॅड बनवणाऱ्या कंपनीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षभरापासून पगारच मिळाला नसल्याचं या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. हेवी इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन (HEC) कंपनीनं चांद्रयान ३ मोहिमेसाठी लाँचपॅड तयार केलं आहे. झारखंडच्या रांचीमध्ये या कंपनीचं मुख्यालय आहे. मात्र, या कंपनीत निधीअभावी गेल्या १७ महिन्यांपासून कर्मचारी व अधिकाऱ्यांना पगारच मिळाला नाहीये.

काय आहे HEC?

एसईसी ही एक सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असून ती अवजड उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येते. रांचीच्या ध्रुव परिसरात ही कंपनी आहे. केंद्र सरकारच्या विविध विभागांना आवश्यक यंत्रसामग्री किंवा सुटे भाग पुरवण्याचं काम या कंपनीकडून केलं जातं. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो, संरक्षण विभाग, रेल्वे विभाग, कोल इंडिया आणि देशातील स्टील उद्योगाकडून या कंपनीला जवळपास दीड हजार कोटींच्या ऑर्डर्स आल्याचंही सांगितलं जातं. मात्र, तरीही कंपनी कर्मचारी व अधिकाऱ्यांना पगार देण्यास असमर्थ ठरल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.

हे वाचले का?  टाटा ट्रस्टला मिळाले नवे चेअरमन! रतन टाटांनंतर कुटुंबातील ‘या’ सदस्याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी

कंपनीकडून अवजड उद्योग मंत्रालयाकडे १ हजार कोटी रुपयांच्या वर्किंग कॅपिटलची मागणी करण्यात आली असून त्याला मंत्रालयाने स्पष्ट शब्दांत नकार दिल्याचा दावा यात करण्यात आला आहे.

मात्र, असं असलं तरीही HEC च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चांद्रयान ३ च्या प्रक्षेपणानंतर आपल्याला या मोहिमेचा हिस्सा होण्यात गर्व असल्याची प्रतिक्रिया दिली होती. चांद्रयान ३ साठी लाँचपॅड बनवण्याचा एकूण खर्च ६०० कोटींच्या घरात गेल्याचाही अंदाज आहे.