चाचण्या पाचपट वाढल्याने रुग्णवाढ

शहरातील दैनंदिन करोनाबाधितांची संख्या दोन हजाराचा टप्पा गाठण्याच्या मार्गावर आहे.

नाशिक : शहरात पूर्वी दैनंदिन एक ते दीड हजाराच्या आसपास चाचण्या व्हायच्या. आता ही संख्या चार ते पाच पट विस्तारून साडेसहा हजारावर जाण्याच्या मार्गावर आहे. चाचण्या वाढविल्याने नवीन बाधित रुग्ण मोठय़ा प्रमाणात आढळत आहेत. जितके लवकर निदान होईल, तितक्या लवकर उपचार सुरू होऊन रुग्णाचे अलगीकरण करता येईल. जेणेकरून त्याच्यापासून इतरांना होणारा प्रादुर्भाव नियंत्रणात आणता येईल. महापालिकेने करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी या निकषावर काम सुरू केले आहे.

शहरातील दैनंदिन करोनाबाधितांची संख्या दोन हजाराचा टप्पा गाठण्याच्या मार्गावर आहे. आदल्या दिवशी एकाच दिवसात १८४९ रुग्ण सापडले. उपचार घेणाऱ्या एकूण रुग्णांची संख्या १२ हजाराचा टप्पा ओलांडण्याच्या मार्गावर आहे. रुग्णसंख्येत अकस्मात इतकी वाढ होण्यामागे चाचण्यांमध्ये झालेली लक्षणीय वाढ हे कारण असल्याचे पालिकेचे आरोग्य-वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी सांगितले.दैनंदिन कामात अनेकांच्या संपर्कात येणाऱ्यांची चाचणी करण्याची मोहीम पालिकेने हाती घेतली आहे. त्या अंतर्गत छोटे-मोठे विक्रेते, दुकानदारांसह केशकर्तनालय चालक, पालिका कर्मचारी आदींची चाचणी करण्याचे निश्चित करण्यात आले. नव्याने सापडणाऱ्या रुग्णांच्या संपर्कातील अधिकाधिक व्यक्तींना शोधून त्यांच्या तपासणीवर भर दिला गेला आहे. या शिवाय मुखपट्टी न लावता फिरणाऱ्यांना पकडून पोलीस चाचणीसाठी रवानगी करतात. यामुळे सध्या दैनंदिन चाचण्यांची संख्या साडेसहा हजारावर जाण्याच्या मार्गावर आहे. याआधी एक ते दीड हजार चाचण्या व्हायच्या. आता हे प्रमाण कित्येक पट वाढविण्यात आले. बुधवारी सहा हजार २०० संशयितांची चाचणी करण्यात आली होती. चाचण्यांद्वारे बाधितांचे शक्य तितक्या लवकर निदान होईल. अलगीककरणाद्वारे त्यांच्यापासून होणारा प्रसार रोखता येईल, याकडे डॉ. नागरगोजे यांनी लक्ष वेधले. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा प्रभावी मार्ग आहे. त्यामुळे सध्याची उंचावणारी रुग्णसंख्या ही चाचण्यांचे प्रमाण वाढल्याचा परिपाक आहे.

हे वाचले का?  अनुसूचित जमातींमधून आरक्षणासाठी धनगर समाजाचे आंदोलन

दरम्यान, अहवालातील विलंब टाळण्यासाठी महापालिकेने बिटको रुग्णालयात प्रयोगशाळा उभारणीचे काम पूर्णत्वास नेले आहे. लवकरच तिथे काम सुरू होईल. जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रयोगशाळेची क्षमता विस्तारण्यात येत आहे. तोपर्यंत पालिका खासगी प्रयोगशाळेकडून चाचण्या करीत आहे.