चार धरणे तुडुंब, नऊमध्ये ७५ टक्क्यांहून अधिक साठा, नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा ५७ टक्क्यांवर.

साधारणत: तीन आठवड्यांपूर्वी तळ गाठण्याच्या मार्गावर असणाऱ्या जिल्ह्यातील धरणसाठ्यात दोन दिवसांतील मुसळधार पावसाने लक्षणीय वाढ झाली.

नाशिक – साधारणत: तीन आठवड्यांपूर्वी तळ गाठण्याच्या मार्गावर असणाऱ्या जिल्ह्यातील धरणसाठ्यात दोन दिवसांतील मुसळधार पावसाने लक्षणीय वाढ झाली. जिल्ह्यातील लहान-मोठ्या २२ धरणांमध्ये ३७ हजार ४८५ दशलक्ष घनफूट म्हणजेच ५७ टक्के जलसाठा झाला. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण तुडुंब होण्याच्या स्थितीत असून या धरण समुहातील अन्य धरणांची पातळी चांगलीच उंचावली आहे. भावली पाठोपाठ वालदेवी, हरणबारी, केळझर ही धरणे भरली असून नऊ धरणांमध्ये ७५ टक्क्यांहून अधिक जलसाठा झाला आहे.

मागील २४ तासात जिल्ह्यात सरासरीच्या ३९ टक्के पावसाची नोंद झाली. सुरगाणा (१६६ मिलीमीटर), त्र्यंबकेश्वर (९५.५), पेठ (८६) आणि इगतपुरी (७२) या भागात मुसळधार पाऊस झाला. याशिवाय नाशिक (३४ मिलीमीटर), दिंडोरी (४०), चांदवड (४६), कळवण (५६), बागलाण (३४) आणि देवळा तालुक्यात ३३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे जलसाठा उंचावण्यास हातभार लागला. मागील आठवड्यात काही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर होती. या पावसाने त्यांची संख्या वाढली. ऑगस्टच्या पूर्वार्धात प्रत्येक धरणात किती जलसाठा करता येतो हे निश्चित असते. त्यानुसार गंगापूर आणि दारणासह अन्य धरणांत ८५ टक्के जलसाठा ठेवला जाईल. त्यामुळे उर्वरित अधिकचे पाणी धरणातून सोडले जात आहे. ऑगस्टच्या प्रारंभी नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ४८३४ दशलक्ष घनफूट (८५ टक्के), काश्यपी ९४५ दशलक्ष घनफूट (५१ टक्के), गौतमी गोदावरी १६३० (८७) व आळंदी धरणात ६०९ दशलक्ष घनफूट (७५ टक्के) जलसाठा झाला आहे.

हे वाचले का?  नाशिक: धोकादायक पद्धतीने मालमोटार चालवून समाजमाध्यमांत प्रसिद्धीचा सोस अंगाशी

पालखेड (६४ टक्के), करंजवण (५६), वाघाड (७३), ओझरखेड (३३), पुणेगाव (७६), तिसगाव (सात टक्के), दारणा (८५ टक्के), भावली (१०० टक्के), मुकणे (५३), वालदेवी (१००), कडवा (८२) , भोजापूर (९७), चणकापूर (७५), हरणबारी (१००), केळझर (१००), गिरणा (२६), पुनद (५०) टक्के असा जलसाठा आहे. माणिकपुंज आणि नागासाक्या ही धरणे आजही कोरडी आहेत. पावसामुळे पाणी टंचाईचे संकट दूर होण्यास मदत झाली आहे.

हे वाचले का?  लाच स्वीकारताना वेतन भविष्य निर्वाह निधी पथकची महिला अधिकारी जाळ्यात

अजूनही तीन टक्के जलसाठा कमी

प्रारंभीच्या दोन महिन्यातील जलसाठा आणि मागील वर्षातील जलसाठा यात मोठी तफावत दिसत होती. मुसळधार पावसाने ही कसऱ भरून काढली. गतवर्षी याच काळात धरणांमध्ये ३९ हजार ५३ दशलक्ष घनफूट म्हणजे ५९ टक्के जलसाठा होता. या तुलनेत सध्या धरणांमध्ये तीन टक्के जलसाठा कमी आहे.

हे वाचले का?  नाशिक: मैत्रीपूर्ण लढतीची अजित पवारांना धास्ती, स्वकीय इच्छुकांचे प्रस्ताव धु़डकावले