चित्रमहर्षी दादासाहेब फाळके स्मारक कात टाकणार

महापालिकेने सुमारे २० वर्षांपूर्वी पांडवलेणीच्या पायथ्याशी दादासाहेब फाळके स्मारकाची उभारणी केली.

एन.डी. स्टुडिओजच्या धर्तीवर विकास करण्याचा नितीन देसाई यांचा मानस

नाशिक : स्थानिक कलाकारांना सादरीकरणासाठी व्यासपीठ, मालिकांच्या चित्रीकरणाची व्यवस्था, सांस्कृतिक वारसा वृध्दिंगत करण्यासाठी विविध संकल्पना, प्रकाशमय कारंजे, याद्वारे चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके स्मारकास गतवैभव प्राप्त करून देण्याची तयारी प्रसिध्द कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी दर्शविली आहे. कर्जत येथील एन. डी. स्टुडिओजच्या धर्तीवर फाळके स्मारकाचा विकास करण्याचा मानस आहे. देसाई यांच्या एन. डी. स्टुडिओसह मुंबईतील मंत्रा कंपनीतर्फे गुरूवारी याबाबत येथे सादरीकरण करण्यात आले.

महापालिकेने सुमारे २० वर्षांपूर्वी पांडवलेणीच्या पायथ्याशी दादासाहेब फाळके स्मारकाची उभारणी केली. हिरवळ, खेळणी, अ‍ॅम्पी थिएटर, कला दालन, संगीत कारंजा आणि चित्र प्रदर्शन आदींमुळे सुरूवातीच्या काळात पर्यटकांची गर्दी होत असे. कालांतराने परिस्थिती बदलली. स्मारकाची दयनीय स्थिती झाली. पर्यटकांनी पाठ फिरवली. प्रारंभीच्या काळात एक कोटीहून अधिक उत्पन्न देणाऱ्या स्मारकाचे उत्पन्न कमालीचे घटले. देखभाल-दुरुस्तीवर मोठी रक्कम खर्च होत आहे. या पार्श्वभूमीवर, महापालिकेने दादासाहेब फाळके स्मारक पीपीपी तत्वावर विकसित करण्याचे निश्चित केले. त्या अनुषंगाने इच्छुक संस्थांकडून स्वारस्य निविदा मागविण्यात आल्या. त्यास देसाई यांची एन. डी. स्टुडिओ आणि मुंबईतील मंत्रा या दोन संस्थांनी प्रतिसाद दिला आहे. उभयतांकडून फाळके स्मारक विकसित करण्याच्या अनुषंगाने सादरीकरण करण्यात आले. मंत्रा संस्थेने लेखी स्वरुपात माहिती दिली. तर देसाई यांनी वेगवेगळ्या संकल्पना मांडल्याचे पालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले.

हे वाचले का?  नाशिक: मैत्रीपूर्ण लढतीची अजित पवारांना धास्ती, स्वकीय इच्छुकांचे प्रस्ताव धु़डकावले

कर्जत येथे देसाई यांनी एन. डी. स्टुडिओची उभारणी केलेली आहे. त्याच धर्तीवर फाळके स्मारकाचा विकास करण्याची तयारी त्यांनी दर्शविली. फाळके स्मारकाच्या २६ एकर जागेत आधीपासून काही व्यवस्था अस्तित्वात आहे. त्यासंबंधीचे नकाशे, माहिती दोन्ही इच्छुक संस्थांना दिले जातील. त्या आधारे स्मारकात नाविण्यपूर्ण संकल्पना कुठे, कशा साकारता येतील, याची माहिती देण्यास सांगण्यात आल्याचे जाधव यांनी सांगितले. फाळके स्मारकात चित्रपटसृष्टी उभारण्याबाबत चर्चा सुरू आहे.या प्रकल्पात इच्छुक संस्था किती गुंतवणूक करणार याबद्दल विचारणा करण्यात आली. स्टुडिओ असल्यास मालिकांचे चित्रीकरण होईल. त्याद्वारे संस्थेला उत्पन्न मिळू शकते. स्मारकाच्या देखभाल दुरुस्तीसाठी महिन्याला पाच ते सात लाख रुपये खर्च करावे लागतात. खासगी संस्थेच्या सहकार्यातून फाळके स्मारकाचा विकास झाल्यास या खर्चातून सुटका होणार आहे.

हे वाचले का?  नाशिक : रस्त्यांवरील मंडपांमुळे वाहतुकीला अडथळा