ग्राहकांची चोरी गेलेली महत्वाची माहिती ३० लाख रुपयांना विकली जातेय
भारतातील चीनची गुंतवणूक असलेल्या ‘बिग बास्केट’ या ऑनलाइन किराणा माल विकणाऱ्या कंपनीवर सायबर अटॅक झाला असून सुमारो दोन कोटी ग्राहकांची माहिती चोरली गेली आहे. तसेच ही माहिती डार्कवेबवर ३० लाख रुपयांना विकली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमेरिकेतील सायबर सिक्युरिटी इंटेलिजन्स फर्म ‘साबल इंक’ने याबाबत माहिती दिली आहे.
सायबल इंकच्या ब्लॉग पोस्टनुसार, जी माहिती चोरीला गेली आहे त्यामध्ये ग्राहकांची नावं, ई-मेल आयडी, पासवर्ड, पिन, मोबाईल क्रमांक, पत्ता, जन्मतारीख, आयपी अॅड्रेस आणि ठिकाणं आदी संपूर्ण माहितीचा समावेश आहे. बंगळुरूस्थित असलेल्या बिग बास्केट कंपनीने शहरातील सायबर क्राईम सेलमध्ये यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, कंपनी सध्या माहिती चोरल्याच्या दाव्याची पडताळणी आणि विश्लेषणात व्यस्त आहे.
बिग बास्केटनं म्हटलं की, आम्ही ग्राहकांची खासगी माहिती आणि गोपनियतेला प्राधान्य देतो. ग्राहकांचा फानान्शिअल डेटा आम्ही स्टोअर करत नाही, ज्यामध्ये क्रेडिट कार्ड्सचे नंबर वैगरेंचा समावेश असतो. आम्ही खात्री देतो की ग्राहकांची फानान्शिअल माहिती सुरक्षित आहे.
सायबल ब्लॉगच्या पोस्टनुसार, बिग बास्केटच्या ग्राहकांच्या माहितीची चोरी १४ ऑक्टोबर २०२० रोजी झाली होती. त्यानंतर १ नोव्हेंबर रोजी कंपनीच्या व्यवस्थापनाला याबाबत सूचित करण्यात आलं होतं.