गेल्या दोन वर्षांत या लष्कराच्या दोन तुकड्या म्हणजेच सुमारे ३५ हजार सैनिक चीनच्या सीमेवर तैनात करण्यात आले आहेत.
लेहमधील भारत-चीन सीमा सुरक्षा परिस्थितीबाबत लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी मोठे पाऊल उचलले आहे. लडाख भागात लष्कराच्या सहा नव्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. या तुकड्या आगोदर दहशतवादविरोधी भूमिका आणि पाकिस्तानवर लक्ष ठेवण्यासाठी तैनात करण्यात आल्या होत्या. चीन सीमेवरील वाढता धोका लक्षात घेता प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (LAC) सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
भारतीय लष्कराकडून सैन्याची पुनर्रचना
चीनसोबत भारताचा सीमावाद दोन वर्षांहून अधिक काळापासून सुरू आहे, तेव्हा चिनी सैन्याने भारतीय चौक्यांवर मोठ्या प्रमाणात आपले सैनिक तैनात केले होते. त्यानंतर आता भारतीय लष्कर आपल्या सैन्याची पुनर्रचना करत आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानकडून येणार्या आव्हानांना आणि धोक्यांना तोंड देण्यासाठी अगोदर उत्तरेकडील सीमेवर ज्या तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. त्यांना आता चीनच्या सीमेवर तैनात करण्यात आले आहे.
सुमारे ३५ हजार सैनिक चीन सीमेवर तैनात
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांत या लष्कराच्या दोन तुकड्या म्हणजेच सुमारे ३५ हजार सैनिक चीनच्या सीमेवर तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय, राष्ट्रीय रायफल्सची एक तुकडी जम्मू-काश्मीरमधून बंडखोरीविरोधी कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी तैनात करण्यात आली होती. आता त्या तुक़डीला पूर्व ल़डाख सेक्टरमध्ये तैनात करण्यात आले आहे. तेजपूर येथील गजराज कॉर्प्सच्या अंतर्गत आसाममधील एक तुकडी राज्यातील बंडविरोधी कारवाया रोखण्यासाठी तैनात करण्यात आली होती. मात्र, आता त्या तुकडीला भारत-चीनच्या ईशान्य सीमेवर तैनात करण्यात आले आहे. लष्कराची तुकडी कमी केल्यामुळे आता आसाममध्ये दहशतवादविरोधी कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी कोणतीही तुकडी नसल्याचे समोर आले आहे.
दोन वर्षांपूर्वी लडाख सेक्टरमध्ये भारतीय लष्कराची चिनी लष्कराशी चकमक
दोन वर्षांपूर्वी लडाख सेक्टरमध्ये भारतीय लष्कराची चिनी लष्कराशी चकमक झाली होती. त्यानंतर, काउंटर टेररिस्ट राष्ट्रीय रायफल फोर्सच्या अतिरिक्त तैनातीसह भारताची तिसरी तुकडी मजबूत करण्यात आली होती. एप्रिल-मे २०२२ पूर्वी, तीन तुकड्या पाकिस्तान सीमेवर तैनात करण्यात आल्या होते. भारताने LAC वर एवढ्या मोठ्या संख्येने सैन्य तैनात केल्याने LAC वर घुसखोरीचा कोणताही प्रयत्न शक्य होणार नाही, असा संदेश चिनी लष्करालाही गेला आहे. चीनने भारतीय सीमेवर मोठ्या प्रमाणात आपले सैन्य तैनात केल्यानंतर, भारतानेही त्याच पद्धतीने सैन्य तैनात केले आहे. सुमारे ५० हजार सैनिक भारत-चीन सीमेवर तैनात करण्यात आले आहेत.