चीनमध्ये करोना रुग्णांचा विस्फोट; भारताच्या आरोग्यमंत्र्यांनी घेतली तातडीची बैठक, अधिकाऱ्यांना आदेश देत म्हणाले…

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली.

ज्या चीनमधून करोना विषाणू जगभरात पसरला, त्या चीनमध्ये पुन्हा करोनाच्या ओमायक्रॉन विषाणूनं हाहाकार माजवला आहे. जगभरात करोना रुग्णांची संख्या कमी होऊन परिस्थिती सामान्य होत असताना चीनमधील ही भयानक परिस्थिती धडकी भरवणारी आहे. चीनमध्ये अचानक करोना रुग्णांचा विस्फोट झाला असून रुग्णालये कमी पडू लागली आहेत. भारतदेखील नुकताच तिसऱ्या लाटेतून सावरला आहे. ज्या ओमायक्रॉनने जगभरातील अनेक देशांमध्ये रुग्णसंख्या वाढवली होती, त्याचा प्रभाव भारतात मात्र तितकासा दिसून आला नाही. परंतु जगातल्या काही देशांमधील वाढती रुग्णसंख्या पाहून केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली आहे.

हे वाचले का?  अनुसूचित जाती, जमातींतही ‘क्रीमिलेयर’ हवे; घटनापीठातील चार न्यायमूर्तींची महत्त्वाची सूचना

इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी अधिकार्‍यांना तीन बाबींचेकाटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामध्ये रुग्णसंख्या वाढण्याबाबत सतर्कता, संसर्गावर बारीक लक्ष ठेवणे आणि जास्तीत जास्त जीनोम सिक्वेंसिंग यांचा समावेश आहे. या बैठकीला देशातील प्रमुख डॉक्टर, आरोग्य सचिव, जैवतंत्रज्ञान विभाग (DBT) सचिव, NCDC प्रमुख आणि भारताचे औषध नियंत्रक जनरल उपस्थित होते.

हे वाचले का?  Lateral entry ad cancel: वरिष्ठ अधिकाऱ्यांची थेट भरती अखेर UPSC कडून रद्द; विरोधकांच्या दबावानंतर केंद्र सरकारचे घुमजाव

चीनमधील परिस्थिती

बुधवारी चीनमध्ये करोनाचे ३ हजार २९० रुग्ण आढळून आले. यापूर्वी मंगळवारी एका दिवसात पाच हजारांहून अधिक करोना रुग्ण चीनमध्ये आढळून आले होते. हा नवीन विषाणू अधिक संसर्गजन्य आणि घातक असल्याने चिंता व्यक्त केली जातेय. चीनमध्ये झिरो कोव्हिड धोरण अंमलात आणण्याचा प्रयत्न असल्याने इतर देशांच्या तुलनेत कमी रुग्ण संख्या वाटत असली तरी हजारच्या वर रुग्ण आढळल्यास येथील यंत्रणेला युद्धपातळीवर काम करण्याचे आदेश दिले जातात. मागील काही दिवसांमध्ये चीनमध्ये अनेक शहरांमध्ये काही प्रमाणात लॉकडाऊन जारी करण्यात आलाय.

हे वाचले का?  समुद्रातून डिझेल तस्करी करणारी टोळी जेरबंद; रायगडच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई