चीनला मागे टाकत भारताची आघाडी! UNFPA नं जाहीर केली सविस्तर आकडेवारी; वाचा नेमकं काय म्हटलं अहवालात

United Nations Population Fund च्या स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशनच्या अहवालानुसार संपूर्ण जगाची लोकसंख्या ८ बिलिअनपेक्षाही अधिक झाली आहे. यामध्ये भारत आणि चीनचा सर्वाधिक वाटा आहे

जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून तोरा मिरवणाऱ्या चीनचा भारताने रेकॉर्ड मोडला आहे. United Nations Population Fund च्या स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशनच्या अहवालानुसार भारताची लोकसंख्या चीनपेक्षा किंचितशी वाढली असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, येत्या काळात लोकसंख्येच्या बाबतीत भारत चीनपेक्षाही अधिक पुढे जाईल, असंही या अहवालात नोंदवण्यात आलं आहे.

United Nations Population Fund च्या स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशनच्या अहवालानुसार संपूर्ण जगाची लोकसंख्या ८ बिलिअनपेक्षाही अधिक झाली आहे. यामध्ये भारत आणि चीनचा सर्वाधिक वाटा आहे. भारत-चीनमध्ये जगाच्या एकूण लोकसंख्येपेक्षा एक तृतीयांश लोक आहेत. या अहवालानुसार भारताची लोकसंख्या १४२.८६ कोटी झाली असून चीनची १४२.५७ कोटी नोंदवण्यात आली आहे.

हे वाचले का?  Aparajita Woman and Child Bill : बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यास फाशी; पश्चिम बंगाल सरकारचं नवं विधेयक

अहवालानुसार, भारताचा प्रजनन दर सरासरी २.० नोंदवण्यात आला आहे. तर, सरासरी आर्युमान पुरुषांसाठी ७१ वय तर महिलांसाठी ७४ वय आहे. २०२२ च्या आकडेवारीनुसार भारतीयांचं सरासरी आर्युमान ६९ वय होतं. आता ते वाढून ७१ झाले आहे. या अहवालात २०२२ मध्ये भारताची लोकसंख्या १४०.६ कोटी नोंदवण्यात आली होती. यापैकी ६८ टक्के १५ ते ६४ वयोगटातील लोकांचा समावेश होता. तर, नव्या अहवालानुसार, २० कोटींहून अधिक लोकसंख्या १५ ते २४ या तरुण वयोगटातील आहेत. धक्कादायक म्हणजे, गेल्या वर्षीपेक्षा यंदा १.५६ टक्क्यांनी भारताची लोकसंख्या वाढली आहे.

हे वाचले का?  PM Modi calls Biden: पंतप्रधान मोदींचा बायडेन यांना फोन; युक्रेन दौरा आणि बांगलादेशमधील हिंदूंच्या सुरक्षिततेवर चर्चा

“भारताची स्वतंत्र शक्तीशाली कथा आहे. भारत वेगाने शैक्षणिक, सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता, आर्थिक प्रगती, तंत्रज्ञान यात प्रगती करत आहे. या देशात २० कोटींहून अधिक जनता १५ ते २४ या वयोगटातील असल्याने नवे प्रयोग होण्याचा पर्याय आहे”, असं UNFPA मधील भारताच्या लोकप्रतिनिधी अॅण्ड्रे वोजनार यांनी म्हटलं आहे.

चीनची लोकसंख्या घटली

विविध क्षेत्रात वेगाने प्रगती करत असलेला चीन देश लोकसंख्येच्याबाबतीत जगभरात अव्वल क्रमांकावर होता. परंतु, गेल्यावर्षी चीनची लोकसंख्या गेल्या सहा दशकांत पहिल्यांदा घसरली. तर, यंदाही या आकडेवारीत घसरण झालेली आहे. २०२२ मध्ये चीनची लोकसंख्या १४४.८५ कोटी नोंदवण्यात आली होती. तर, नव्या अहवालानुसार चीनमध्ये १४२.५७ लोकसंख्या असण्याचे सांगण्यात येत आहे.

हे वाचले का?  Vinesh Phogat : “ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर भारत सरकारने सहकार्य केलं नाही”, विनेश फोगटचा गंभीर आरोप