सोमवारच्या दूरचित्रवाणी वाहिनीवरील चर्चेपूर्वी, सुनक यांनी त्यांच्या संदेशात चीनच्या आक्रमक धोरणाचा ऊहापोह केला .
लंडन : चीनचा ब्रिटनसह जगाच्या समृद्धी व सुरक्षेला फार मोठा धोका असल्याचा दावा ब्रिटनचे पंतप्रधानपदाच्या स्पर्धेतील हुजूर पक्षाचे (काँझर्वेटिव्ह पार्टी) उमेदवार ऋषी सुनक यांनी सोमवारी केली. अमेरिका आणि भारताला चीनने आपले लक्ष्य केले आहे, हा याचा सर्वात मोठा पुरावा असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
सोमवारच्या दूरचित्रवाणी वाहिनीवरील चर्चेपूर्वी, सुनक यांनी त्यांच्या संदेशात चीनच्या आक्रमक धोरणाचा ऊहापोह केला .‘रेडी4ऋषि’ या त्यांच्या ‘ऑनलाइन’ प्रचारमोहिमेत सुनक यांनी सांगितले, की माझी पंतप्रधानपदी निवड झाल्यास तंत्रज्ञान क्षेत्रातील चीनचा दबदबा कमी करण्यासाठी ‘नॉर्थ अटलांटिक ट्रिअटी ऑर्गनायझेशन’ (नाटो) या लष्करी आघाडीच्या धर्तीवर सार्वभौम देशांसाठी एक नवीन सुरक्षा आघाडीसह विविध उपाययोजना करेन. ब्रिटनमध्ये असलेली चीनची ३० केंद्रे बंद करेन.
जगात चीनचे सर्वाधिक कन्फ्युशियस केंद्र ब्रिटनमध्ये आहेत. चीनच्या अर्थपुरवठय़ाने सुरू असलेल्या या केंद्रातर्फे चिनी संस्कृती व भाषा केंद्र म्हणून ते कार्य करतात. परंतु पाश्चात्त्य देश आणि चीनदरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर असा आक्षेप घेतला जात आहे, की चीन त्याचा आपल्याला अनुकूल प्रचारासाठी वापर करत आहे.
सुनक यांनी सांगितले, की चीन आणि चीनच्या साम्यवादी पक्षाचा ब्रिटनसह अवघ्या जगाच्या सुरक्षा-शांती-समृद्धीस मोठा धोका आहे. चीनकडून निर्माण झालेल्या सायबर धोक्यांपासून बचावासाठी मी सार्वभौम देशांची एक आंतरराष्ट्रीय सुरक्षा संघटना बनवेन. उद्योग-तंत्रज्ञानाच्या सुरक्षेसाठी विविध उपायोजना शोधून काढू. या सुरक्षा संघटनेतर्फे ब्रिटन सायबर सुरक्षा, दूरसंचार सुरक्षा व बौद्धिक संपदेची चोरी रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय निकष आणि मानकांच्या समन्वयासाठी काम करेन.
सुनक यांनी चीनवर ब्रिटनचे तंत्रज्ञान चोरल्याचा आणि विद्यापीठांमध्ये घुसखोरी केल्याचा आरोप करत म्हटले, की चीन युक्रेन युद्धात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना पाठिंबा देत आहे. शिनजियांग आणि हाँगकाँगमधील मानवाधिकारांचे उल्लंघन करत आहे. ते म्हणाले की, मी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि इतर जागतिक नेत्यांसोबत काम करेन जेणेकरून सर्व पाश्चात्त्य देश चीनच्या धोक्याचा सामना करण्यासाठी एकत्र येतील.
‘ अर्थमंत्री असताना चीनबाबत मवाळ!’
हुजूर पक्षाचे नेतृत्वपद व पंतप्रधानपदासाठी माजी अर्थमंत्री सुनक यांची परराष्ट्र मंत्री लिझ ट्रुस यांच्याशी चुरशीची लढत होत आहे. ट्रुस यांच्या प्रवक्त्याने सुनक यांच्यावर टीका केली, की त्यांच्या अर्थमंत्रिपदाच्या कारकीर्दीत त्यांनी चीनबाबत मवाळ भूमिका घेतली होती. ट्रुस परराष्ट्र मंत्री झाल्यापासून त्यांनी चीनबाबत भक्कम धोरण अवलंबले. चीनच्या आक्रमक धोरणांना ठाम विरोध करताना त्या आंतरराष्ट्रीय स्तरावर आघाडीवर होत्या.