जानेवारीच्या मध्यावर गारवा, नाशिकमध्ये ११.१ नीचांकी तापमानाची नोंद

एकाच दिवसात तापमानात सुमारे चार अंशांचा फरक पडल्याने गारवा निर्माण झाला. वातावरणातील स्थितीवर तापमानातील पुढील चढ-उतार अवलंबून आहे.

नाशिक : अल निनोचा प्रभाव आणि उत्तरेकडून वाहत येणाऱ्या वाऱ्याच्या मार्गातील अवरोधामुळे कडाक्याच्या थंडीपासून वंचित राहिलेल्या नाशिक जिल्ह्यात सोमवारी ११.१ अंश या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. याआधी १६ डिसेंबर रोजी तापमान १२.५ अंशावर आले होते. एकाच दिवसात तापमानात सुमारे चार अंशांचा फरक पडल्याने गारवा निर्माण झाला. वातावरणातील स्थितीवर तापमानातील पुढील चढ-उतार अवलंबून आहे. मागील १३ हंगामात चार ते ९.१ अंश या दरम्यान नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. यंदाचा हंगाम मात्र त्यास अपवाद ठरला. अद्याप तापमान १० अंशांच्या खाली गेलेले नाही.

यंदाच्या हंगामात कडाक्याची थंडी नाशिकमधून अंतर्धान पावल्याची स्थिती होती. एरवी डिसेंबर, जानेवारीत हुडहुडी भरवणारी थंडी अनुभवयास मिळते. यावर्षी तसे झाले नाही. उत्तरेकडून वाहत येणाऱ्या वाऱ्याचा प्रभाव नाशिकच्या वातावरणावर पडतो. उत्तरेकडे बर्फवृष्टी आणि तीव्र थंडी असतानाही पश्चिम भागातील स्थितीमुळे वाऱ्यांना अवरोध निर्माण झाला होता. अल निनोचाही प्रभाव आहे. यामुळे नाशिकमध्ये नेहमीप्रमाण थंडी जाणवली नसल्याचे हवामानशास्त्र तज्ज्ञ सांगतात. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर जानेवारीच्या मध्यावर पारा प्रथमच ११.१ अंशावर आला. यामुळे सकाळी काहीसा गारवा होता. रविवारी संध्याकाळपासून उत्तरेकडून वाहत येणाऱ्या वाऱ्यामुळे वातावरणात बदल झाले. सकाळी हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाल्याचे हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे. हंगामाच्या अखेरच्या चरणात ही स्थिती निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

हे वाचले का?  नाशिक: विद्यार्थी नवीन गणवेशापासून वंचित, जुन्याच गणवेशावर स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात सहभाग

थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये या हंगामात दिवाळीपासून कडाक्याची थंडी फारशी जाणवली नव्हती. मध्यंतरी सर्वत्र दाट धुके पसरले होते. परंतु, कडाक्याच्या थंडीपासून नाशिक दूर राहिले होते. मागील काही वर्षात अनेक दिवस थंडीची अनुभूती मिळत होती. डिसेंबर, जानेवारीमध्ये नीचांकी तापमानाची नोंद होत असे. अनेकदा तापमान १० अंशाच्या खाली गेल्याची उदाहरणे आहेत. यंदाचा हंगाम मात्र त्यास अपवाद ठरला. मागील महिन्यात म्हणजे १६ डिसेंबर रोजी तापमान १२.५ अंशावर गेले होते. एकदाही थंडीची लाट जाणवली नाही. त्यास सध्याच्या नीचांकी तापमानाने पसरलेला गारठा अपवाद ठरले. पश्चिमेकडील काही अवरोध व अल निनोच्या प्रभावाने या हंगामात आतापर्यंत थंडीची लाट आली नसल्याचे हवामानशास्त्र तज्ज्ञ सांगतात.

हे वाचले का?  मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानेच मतदान केल्याच्या घटना, नाशिक पश्चिममध्ये १५७ जणांचे प्रदत्त मतदान

हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार डिसेंबरमध्ये अनेकदा काही दिवस पारा १० अंशाच्या खाली असतो. त्यामुळे थंडीची लाट आल्याची अनुभूती मिळते. चालू हंगामात आतापर्यंत ११.१ हे नीचांकी तापमान ठरले. या पातळीवर ते किती तग धरेल, यावर थंडीचा पुढील प्रवास अवलंबून आहे.

मागील १३ हंगामातील नीचांकी तापमान

  • २०११ (सात जानेवारी) – ४.४ अंश
  • २०१२ (नऊ फेब्रुवारी – २.७ अंश
  • २०१३ (सहा जानेवारी) – ४.४ अंश
  • २०१४ (१८ जानेवारी) – ६.४ अंश
  • २०१५ (११ जानेवारी) – ५.६ अंश
  • २०१६ (२२ जानेवारी) – ५.५ अंश
  • २०१७ (११ जानेवारी) – ५.८ अंश
  • २०१८ (२९ डिसेंबर) – ५.१ अंश
  • २०१९ (नऊ फेब्रुवारी) – ४ अंश
  • २०२० (१७ जानेवारी) – ६ अंश
  • २०२१ (नऊ फेब्रुवारी) – ९.१ अंश
  • २०२२ (२५ जानेवारी) – ६.३ अंश
  • २०२३ १० जानेवारी) – ७.६ अंश)
हे वाचले का?  देवळालीत सरावावेळी तोफगोळ्याचा स्फोट, दोन अग्निविरांचा मृत्यू